वय वाढलं की सांधे दुखणे, सकाळी उठल्यावर कडकपणा येणे, गुडघे-मान-कंबर दुखणे हे खूप सामान्य झाले आहे. पण फक्त गोळ्या घेऊन हा त्रास कमी होत नाही. रोजच्या जीवनशैलीत काही गोष्टी पाळल्या तर वेदना बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात राहते.
1. काय काय टाळायला हवं -
सतत पायऱ्या चढणे-उतरणे टाळा. एकाच जागी खूप वेळ उभे राहू नका किंवा ऑफिसमध्ये सलग तासन्तास बसून राहू नका. जड वजन उचलणे, झटकन वाकणे, जमिनीवर उकिडवे बसणे हे सांध्यांवर थेट ताण आणते.
खाण्यात वात वाढवणारे, खूप थंड पाणी, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, तेलकट आणि मैद्याचे पदार्थ कमी करा. स्वतःहून पेनकिलर घेणे बंद करा, वेदना असतानाही कामाचा अतिरेक करू नका. उंच टाचांचे बूट किंवा सपोर्ट नसलेले चप्पल वापरू नका.
2. आहारात काय ठेवाल -
ज्वारी आणि नाचणीची भाकरी शरीरासाठी हलकी आणि कॅल्शियमने भरलेली असते. रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या जसे मेथी, पालक, शेपू, डाळी, फळांमध्ये पपई, सफरचंद, डाळिंब, संत्री ठेवा.
दूध, ताक, पनीर, अंडी यातून प्रथिने आणि कॅल्शियम मिळते. हळद, आले, लसूण यांचा योग्य वापर सूज कमी करायला मदत करतो. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्या, जेवण वेळेवर घ्या. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटे बसल्याने व्हिटॅमिन D नैसर्गिकरित्या मिळते.
3. घरगुती सोपे उपाय -
रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिणे आणि दाणे चावून खाणे, अनेकांना 2 ते 3 महिन्यात फरक जाणवतो. तीळ किंवा जवस रोज थोडे चावून खाणे फायदेशीर ठरते.
कोमट पाण्याचा शेक घेतल्याने कडकपणा कमी होतो. रात्री झोपताना पायाखाली छोटी उशी ठेवल्यास सूज आणि दुखणे कमी वाटते. सकाळी उठल्यावर 5 मिनिटे हलके स्ट्रेचिंग करा आणि दिवसभर दर 30 ते 40 मिनिटांनी थोडी हालचाल करा.
4. व्यायाम आणि हालचाल कशी असावी -
रोज हलके चालणे, योग, प्राणायाम, स्ट्रेचिंग करा. पण लक्षात ठेवा, दुखणे वाढवणारा व्यायाम करू नका. व्यायामाआधी शरीर थोडे गरम करा आणि नंतर स्ट्रेच करा. गुडघे, कंबर, मान यासाठीचे व्यायाम नेहमी फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने करा. जिना जास्त वापरणे टाळा, गरज असेल तर काठी किंवा वॉकर वापरण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
5. पथ्य कधी मोडू नये -
वजन वाढू देऊ नका, कारण जास्त वजन म्हणजे गुडघ्यांवर थेट दाब. पुरेशी झोप घ्या, ताणतणाव कमी ठेवा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या, वेदना कमी झाली म्हणून स्वतःहून औषध बंद करू नका.
जर सांध्यात लालसरपणा, खूप सूज, ताप, सकाळी खूप वेळ कडकपणा राहणे, चालणे कठीण होणे असेल तर लगेच डॉक्टरांना भेटा. पायाला सूज असेल तर कोमट पाण्यात खडे मीठ टाकून 10 ते 15 मिनिटे पाय बुडवून ठेवणे हा तात्पुरता आराम देऊ शकतो.
डिस्क्लेमर - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही. कोणताही घरगुती उपाय, आहार बदल किंवा पूरक औषध सुरू करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा ऑर्थोपेडिक तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.