सर्दी खोकला झाला की पूर्ण दिवस अस्वस्थ जातो. नाक बंद, घसा दुखणे, सतत खोकला यामुळे कामात लक्ष लागत नाही. हा काही मोठा गंभीर आजार नाही पण यावर गोळ्या औषधांचा फारसा परिणाम होत नाही. अशावेळी आजीच्या बटव्यातले घरगुती उपाय जास्त गुणकारी ठरतात.
1. दूध आणि हळद
गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यायल्यास सर्दी खोकल्यात खूप आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त आहे. हळद ही नैसर्गिक अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल आहे जी सर्दी खोकल्याशी लढण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास बंद नाक मोकळे होते.
2. आल्याचा चहा
आल्याचे अनेक फायदे आहेत पण सर्दी खोकल्यात आल्याचा चहा खूपच आराम देतो. सर्दी खोकला किंवा हलका ताप असेल तर ताजे आले बारीक किसून घ्या आणि एक कप गरम पाण्यात टाकून चांगले उकळवा. त्यात थोडा गूळ किंवा मध टाकून प्यावे. यामुळे घशातील खवखव कमी होते आणि कफ पातळ होतो.
3. लिंबू आणि मध
लिंबू आणि मधाचा हा उपाय सर्दी खोकल्यासाठी खूपच उपयुक्त आहे. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्यावा. मध घशाला आराम देतो तर लिंबातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवते. सकाळी रिकाम्या पोटी हा उपाय केल्यास जास्त फायदा होतो.
4. लसूण
लसूण सर्दी खोकल्याशी लढण्यात खूप मदत करतो. लसणात एलिसिन नावाचे रसायन असते जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असते. लसणाच्या चार ते पाच पाकळ्या तुपात हलक्या भाजून खाव्यात. असे दिवसातून एक दोन वेळा केल्याने आराम मिळतो. लसूण शरीरातील संक्रमण झपाट्याने दूर करतो.
5. तुळशीची पाने आणि आले
तुळस आणि आले हा सर्दी खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनाने लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच ते सात पाने आणि आल्याचा एक छोटा तुकडा टाका. त्याला पाच मिनिटे उकळून काढा तयार करा. जेव्हा पाणी अर्धे होईल तेव्हा तो गाळून प्यावा. लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही हा काढा खूप फायदेशीर आहे.
या उपायांसोबत भरपूर कोमट पाणी प्या आणि थंड पदार्थ टाळा. तरीही तीन दिवसांपेक्षा जास्त त्रास राहिला तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
डिस्क्लेमर - हा लेख घरगुती उपाय आणि सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.