सबंध राज्यभर गाजलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या अपहरणाची आणि निर्घृण हत्येची घटना अजून ताजी असतानाच,
बीडच्या परळीतून पुन्हा एकदा एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे.
परळीतील औष्णिक विद्युत केंद्रासमोरून तुकाराम मुंढे या मोठ्या गुत्तेदाराचं तब्बल ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं.
या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती.मात्र,
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या २४ तासांत या अपहरणाचा छडा लावला असून,
गुत्तेदाराची सुखरूप सुटका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या औष्णिक विद्युत केंद्रात मुंढे गुत्तेदारी करतात, तिथल्याच मुख्य अभियंत्याचा ड्रायव्हर या संपूर्ण गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार निघाल्याचं समोर आलं आहे. पाहुयात हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेतून बीड जिल्हा अजून सावरलेलाही नव्हता. तोच ४ जून रोजी परळीतील औष्णिक विद्युत केंद्रासमोरून गुत्तेदार तुकाराम मुंढे यांचं भरदिवसा अपहरण करण्यात आलं. या घटनेमुळे बीड पोलिसांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तात्काळ विशेष पथक स्थापन केले आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली." "गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांच्या आतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि तुकाराम मुंढे यांची सुखरूप सुटका केली.
पोलिसांनी मुख्य सूत्रधार संतोष वंजारी याच्यासह चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पकडण्यात आलेला संतोष वंजारी हा परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्याचा अधिकृत ड्रायव्हर आहे. त्यानेच इतर तीन साथीदारांच्या मदतीने हा ५ कोटींच्या खंडणीचा कट रचला होता." "तपासादरम्यान समोर आलेली माहिती अधिक धक्कादायक आहे. अपहरणकर्त्यांनी तुकाराम मुंढे यांना, 'तुझ्यामुळे आमच्या साहेबांचं ५ कोटींचं नुकसान झालंय, ते पैसे आम्हाला तुझ्याकडून हवेत' अशी धमकी दिली होती. जेव्हा मुंढेंनी साहेबांशी बोलणं करून देण्याची मागणी केली,
तेव्हा 'आमचे साहेब असं कुणाशी बोलत नाहीत' असं म्हणत आरोपींनी त्यांना दमदाटी केली. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याचं समजताच आरोपींनी मुंढेंच्या डोळ्याला पट्टी बांधून त्यांना अमरावतीच्या हिंगणघाट परिसरात सोडून पळ काढला. मुंढे सुखरूप परत आले असले तरी, या अपहरणामागे औष्णिक विद्युत केंद्रातील काही बडे अधिकारी तर नाहीत ना? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.""या चार आरोपींना परळीत मदत करणारा तो 'पाचवा' व्यक्ती कोण? त्याच्यापासून आता माझ्या जीवाला प्रचंड धोका निर्माण झाला आहे. हे आरोपी अपहरण करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही चार दिवस परळीतच मुक्कामी होते. ते कुठे राहिले? त्यांना कोणी आश्रय दिला? आणि या संपूर्ण कटात त्यांना कोणी कोणी मदत केली? या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात पडद्यामागे असलेल्या सर्व संशयितांना सह-आरोपी करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मी लवकरच पोलीस प्रशासनाला देणार आहे. असं पीडित गुत्तेदार तुकाराम मुंढे यांचं म्हणणं आहे
गुत्तेदार तुकाराम मुंढे यांच्या सुटकेनंतर पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद केलं असलं, तरी मुंढेंच्या दाव्यामुळे या प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं आहे. आरोपींनी उल्लेख केलेले 'साहेब' नेमके कोण? आणि परळीत राहून या गुन्हेगारांना रसद पुरवणारा तो 'पाचवा' सूत्रधार कोण? याचा शोध घेणं आता बीड पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे.
---