पुणे - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत आज 4.87 लाख पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात 4 हजार 765 कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येत आहे. यामुळे आजअखेर आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या एकूण 20.72 लाख पात्र शेतकऱ्यांना 18 हजार 40 कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 12 हजार 886 शेतकऱ्यांना 78.94 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या तसेच 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज आणि पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.
योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने विकसित केलेल्या योजना पोर्टलवर बँकांकडून एकूण 31.17 लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.
आतापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला
महाआयटीमार्फत संगणकीय प्रक्रियेद्वारे तपासणी करण्यात आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चार याद्यांमध्ये एकूण 25 लाख 82 हजार 827 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या यादीत 16 लाख 96 हजार 201, दुसऱ्या यादीत 4 लाख 19 हजार 737, तिसऱ्या यादीत 3 लाख 51 हजार 192 आणि चौथ्या यादीत 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
यापूर्वी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या 15.85 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 13 हजार 275 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. आता आणखी 4.87 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार 765 कोटी रुपये जमा करण्यात येत आहेत.
अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 20.72 लाख पात्र शेतकऱ्यांना 18 हजार 40 कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. पात्र शेतकरी लाभार्थी आणि त्यांना मिळणाऱ्या लाभाच्या रकमेची विभाग आणि जिल्हानिहाय चौकशी यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.