कव्हर स्टोरी : कत्तल... हा शब्दच किती भयंकर आहे. कत्तल होतानाचे दृष्य डोळ्यासमोर येताच काळजात चर्र होतं. विषय कर्जत - भीमाशंकरमधील वृक्षतोडीचा आहे. टोरंट कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या हायड्रोपॉवर प्रकल्पासाठी सुमारे ४८ हजार झाडा - झुडपांची कत्तल सुरू आहे. एकूण ३७७ हेक्टर जमिनीवरील वनसंपदेचा बळी या प्रकल्पासाठी दिला जाणार आहे. जल, जमीन, जंगल आणि जनावरांच्या मुळावर उठलेली ही कृती सध्या वादाचा विषय बनली आहे.
जंगलाला आग लागली तर त्याला वनवा पेटला असे म्हणतात. याठिकाणी जंगलतोडीच्या विरोधाचा वनवा पेटलाय. स्थानिक नागरिकांसह सर्व स्तरांतील पर्यावरणप्रेमी तसेच राजकीय विरोधक या सरकारपुरस्कृत वृक्षतोडीच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. विकासाच्या नावाखाली सुरू असलेला निसर्गाचा विनाश त्यांना अमान्य आहे. अशा परिस्थितीत प्रस्तावित वीज निर्मिती प्रकल्प आणि संभाव्य परिणामांचा ऊहापोह करणारा हा टॉप न्यूज इन मराठीचा स्पेशल रिपोर्ट.
सुरुवातीला हा प्रकल्प नेमका काय आहे ते समजावून घेऊ. विजेची मागणी आणि पुरवठा यातील समतोल साधण्यासाठीचे तंत्रज्ञान या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे त्याला वीज निर्मिती प्रकल्प म्हणायचे की आणखी काही, याबाबत विभिन्न मतप्रवाह आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा पंप्ड स्टोरेज प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी दोन जलाशय बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी एक जलाशय घाटमाथ्यावर म्हणजे भीमाशंकर परिसरात बांधला जाणार आहे. त्याची साठवण क्षमता १५.७६ टीएमसी इतकी असणार आहे. तर दुसरा जलाशय डोंगराच्या पायथ्याला बांधण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील क्षेत्र त्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. पेज नदीवरील या जलाशयात २८.९६ टीएमसी पाणी साठवले जाणार आहे. या दोन्ही जलाशयांतील पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी होणार आहे.
आपल्या राज्यात दिवसाच्या वेळी विजेची मागणी तुलनेने कमी असते. सायंकाळनंतर रात्रीच्या प्रहरी विजेच्या मागणीत मोठी वाढ होते. अशा परिस्थितीत दिवसाच्या वेळी खालच्या जलाशयातील पाणी सौर ऊर्जेचा वापर करून वरच्या जलाशयात न्यायचे आणि रात्रीच्या वेळी वरच्या जलाशयातील पाणी विशिष्ट वेगाने खाली सोडायचे अशी योजना आहे. वरच्या जलाशयातील पाणी खाली येत असताना त्याद्वारे टर्बाईन फिरवायचे आणि त्यातून विजेची निर्मिती करायची असे प्रयोजन आहे. जेणेकरून रात्रीच्या वेळी आवश्यक असलेल्या अतिरिक्त विजेच्या मागणीची पूर्तता होईल. प्रतिदिन तीन हजार मेगावॉट विजेची उपलब्धता या प्रकल्पाच्या माध्यमातून अपेक्षित आहे. वीज पुरवठ्यातील असमतोल दूर करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या प्रस्तावित प्रकल्पाला सायडोंगर - १ असे संबोधण्यात आले आहे.
पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होणे ही आज काळाची गरज आहे. भविष्यात ही गरज आणखीनच वाढत जाणार आहे. त्याच दृष्टिकोनातून सुमारे १५ हजार ८७० मेगावॉट विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट शासकीय पातळीवर ठेवण्यात आले आहे. पंप्ड स्टोरेजच्या माध्यमातून हे उद्दिष्ट गाठण्याचे नियोजन आहे. त्याचाच भाग म्हणून घाटघरमध्ये २५० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित आहे. उदिष्टपूर्तीच्या दृष्टिकोनातून असे एकूण ११ प्रकल्प प्रस्तावित आहेत.
आपल्याकडे औष्णिक तसेच जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून बहुतांश विजेचा पुरवठा होतो. औष्णिक प्रकल्पासाठी कोळशाचा वापर केला जातो. त्याची उपलब्धता तसेच त्यामुळे उद्भवणारे पर्यावरणविषयक प्रश्न उपस्थित करून पंप्ड स्टोरेज तंत्रज्ञानाचे समर्थन सरकारकडून करण्यात येत आहे. कर्जत - भीमाशंकरमधील प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्याशिवाय प्रकल्पासाठी तोडाव्या लागत असलेल्या वृक्षसंख्येच्या दहापट वृक्ष लागवड पर्यायी क्षेत्रांवर करण्यात येणार असल्याचा सरकार तसेच संबंधित कंपनीचा दावा आहे. प्रकल्पग्रस्त नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींना अर्थातच तो मान्य नाही. आता तर त्यांच्या बाजूने राज्यातील विरोधी पक्ष देखील मैदानात उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट प्रकल्पस्थळी जाऊन प्रकल्पाच्या विरोधातील वनवा आणखीनच भडकवला आहे.
वीज आणि विकास हे परस्परावलंबी घटक आहेत. घरगुती वापर, औद्योगीकरण त्याचप्रमाणे शेतीसाठी विजेची गरज असते. विजेची मागणी आणि पुरवठा यांतील तफावतीमुळे वापरकर्त्याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागते. अशा परिस्थितीत स्वस्त तसेच पर्यावरणपूरक विजेची उपलब्धता ही काळाची गरज आहे. सायडोंगर - १ च्या माध्यमातून पुरेशा प्रमाणावर आणि तीदेखील स्वस्त दरामध्ये वीज उपलब्ध होणार असल्याचे एकवेळ मान्य करावयास हरकत नाही. परंतु ही वीज पर्यावरणपूरक असणार आहे का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
जंगल ही एक परिस्थितीकी आहे. त्यातील प्रत्येक वृक्ष एक परिसंस्था असते. जंगलातील वृक्ष, वृक्षांवरील पक्षी, झुडपांमधील प्राणी, फुलपाखरे, कीटक, छोट्या मोठ्या वेली - वनस्पती अशा असंख्य जीवांचा अधिवास म्हणजे जंगल असते. एकीकडे आपण झाडे लावा, झाडे जगवा म्हणतो आणि दुसरीकडे एका झटक्यात हजारो वृक्षांवर घाव घालतो ही बाब मनाला पटण्यासारखी नाही. ' वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे ' असे जगद्गुरु तुकोबाराय सांगून गेले आहेत. आज त्याच सोयऱ्यांची आपल्याकडून अमानुष कत्तल सुरू आहे. कर्जत - भीमाशंकरमधील जंगल हे आपल्याला लाभलेल्या सह्याद्रीचा आत्मा आहे. त्याची चहुबाजूंनी लचकेतोड सुरू आहे. ती वेळीच थांबवली नाही तर संभाव्य दुष्परिणाम अटळ आहेत. त्यासाठी निसर्गच काय, पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. तेव्हा मानवी मनातील स्वार्थ बाजूला ठेवून हे पाप आपल्या हातून घडू नये हीच अपेक्षा.
शब्दांकन : संकेत देशपांडे