सतर्क रहा ! खडकवासला धरणातून 4708 क्युसेक विसर्ग सुरू, निरा देवघर आणि आंद्रा धरणातूनही नदीत पाणी सोडले - टॉप न्यूज मराठी

पुणे : गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आज सकाळपासून खडकवासला, आंद्रा आणि निरा देवघर या तीनही धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला आहे.

पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दि. म. डुबल यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून सकाळी 6:00 वाजल्यापासून मुठा नदीत 4708 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिपावसामुळे हा विसर्ग 3424 क्युसेकवरून वाढवण्यात आला आहे.

दुसरीकडे मावळ तालुक्यातील आंद्रा धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे सकाळी 6:00 वाजल्यापासून धरणाच्या द्वारविरहित सांडव्यावरून आंद्रा नदीत 1248 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पाणलोटात पाऊस कमी झाला असला तरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. भोर तालुक्यातील निरा देवघर धरण सकाळी 8:00 वाजता 94.43 टक्के भरले होते. येव्याचे प्रमाण वाढत असल्याने सकाळी 11:00 वाजल्यापासून विद्युतगृहाद्वारे निरा नदीत 750 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

तीनही धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना नदीपात्रात उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नदीपात्रात सुरू असलेली बांधकामे, शेतीसाठीचे पंप आणि इतर साहित्य तसेच जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पावसाचे प्रमाण आणि धरणातील येव्यावर विसर्ग अवलंबून असल्याने तो कोणत्याही वेळी कमी-जास्त होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. पुढील अपडेट्स तात्काळ देण्यात येतील.