क्रीडा : पुण्याच्या ज्येष्ठ जलतरणपटूंची सुवर्णझेप, नाशिकमध्ये 44 पदकांसह राज्यात नंबर वन - टॉप न्यूज मराठी

Nashik : नाशिकमध्ये झालेल्या सातव्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्समध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या ज्येष्ठ जलतरणपटूंनी धमाका केला आहे. वयाला न जुमानता या खेळाडूंनी तब्बल 44 पदके जिंकली आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला.

फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय या सर्व प्रकारात पुण्याच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. 70 पेक्षा जास्त वय असलेल्या ज्ञानादेव घोडेकर यांनी तीन सुवर्णपदके जिंकली. 65 च्या गटात अरुण काटे यांनी तीन सुवर्णपदके पटकावली, तर दत्तात्रेय बडदाळ यांनी तीन रौप्यपदके मिळवली.

55 च्या गटात संगीता गणबोटे यांनी तीन सुवर्णपदके जिंकून सर्वांचे लक्ष वेधले. शंकर होले यांनीही तीन सुवर्णपदके जिंकली. 60 च्या गटात रामराव मासुळकर आणि नंदू जाधव यांनी प्रत्येकी तीन सुवर्णपदके मिळवली.

40 च्या गटात संभाजी जगदाळे, गिरीश मुळूक आणि रणजित सावंत यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. 30 च्या गटात अनुराग गोळे यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले. विजय दळवी आणि लक्ष्मीकांत पोवार यांनीही दमदार कामगिरी केली.

सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळाले. वय वाढले तरी स्पर्धा करण्याची ऊर्जा कमी होत नाही, हे या खेळाडूंनी दाखवून दिले. त्यांच्या या यशामुळे तरुण खेळाडूंनाही नवी प्रेरणा मिळाली आहे.