अकोला, बार्शीटाकळी - सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या हक्काच्या रेशन धान्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न बार्शीटाकळी पोलिसांनी उधळून लावला आहे. सिंदखेड ते बार्शीटाकळी मार्गावरून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचा संशय असलेला तब्बल 35 ते 40 टन रेशनच्या तांदळाने भरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.
बार्शीटाकळीचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आनंद कांदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत ट्रकचा चालक आणि क्लीनर अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रेशन धान्याच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलिसांनी रेशनच्या तांदळाच्या कथित तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. बुलढाणा येथून रेशनचा तांदूळ भरलेला MH 37 T 2381 क्रमांकाचा ट्रक सिंदखेड ते कारंजा महामार्गावरून जात असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आनंद कांदे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे बार्शीटाकळीजवळ पोलिसांनी महामार्गावर सापळा रचत संबंधित ट्रक अडवला.
ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये जवळपास 35 ते 40 टन रेशनच्या तांदळाची पोती आढळून आली. हा तांदूळ नेमका कुठून आणला होता, तो कुठे नेला जात होता आणि त्याची वाहतूक कोणत्या उद्देशाने केली जात होती, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पुरवठा निरीक्षकांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर ट्रक जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी ट्रकचालक मोहम्मद सादिक मोहम्मद हिरा आणि क्लीनर सादिक खान रफिक खान या दोघांना अटक करण्यात आली आहे.
एकीकडे गरजू लाभार्थ्यांना हक्काचे रेशन मिळावे, यासाठी शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून धान्याचे वाटप केले जाते, तर दुसरीकडे याच धान्याच्या अवैध वाहतुकीचा संशय निर्माण झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे महत्त्वाचे आहे.
या तांदळाचा मूळ स्रोत, वाहतुकीमागील उद्देश आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक आनंद कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीटाकळी पोलीस आणि पुरवठा निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.
प्रतिनिधी : प्रतीक कुऱ्हेकर, अकोला