अभिमानास्पद ! खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक - टॉप न्यूज मराठी

विदेश : भारताने 19 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये म्हणजेच IOAA 2026 मध्ये दमदार कामगिरी केली आहे.

ही स्पर्धा 11 ते 21 ऑगस्ट दरम्यान मुंबईत पार पडली होती, ज्यात 63 देशांतील 288 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय संघाने या स्पर्धेत 4 सुवर्णपदके आणि 1 रौप्यपदक पटकावले आहे.

पदक विजेते विद्यार्थी असे आहेत:

कनिष्क शर्मा, रजत बोरडे, रोहन पांडे आणि बनाफशा या चार विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. तर नील मेहता याने रौप्यपदक मिळवले आहे. या संघाचे नेतृत्व भौतिकशास्त्राचे प्राध्यापक करत होते. या विजयामुळे भारत पदक तालिकेत अव्वल स्थानी राहिला आहे.

IOAA म्हणजे काय?

IOAA ही जगातील सर्वात मोठी खगोलशास्त्र स्पर्धा आहे. यात माध्यमिक शाळेतील विद्यार्थी सहभागी होतात. यात लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि आकाश निरीक्षण अशा तीन टप्प्यात परीक्षा घेतली जाते.

भारतीय विद्यार्थ्यांची निवड कशी होते?

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामार्फत राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेतली जाते. त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठवले जाते. या यशामुळे भारतीय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पियाडसाठी तयारीला वेग आला आहे.