थंडीच्या दिवसात सहज म्हणून किंवा मुलांना गरम वाटावे म्हणून अनेक पालक मुलांच्या हातात गरम चहाचा कप देतात. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सकाळ संध्याकाळ आई बाबांसोबत बसून चहा पिणे ही अनेक घरांमधील सवय बनली आहे. एकदा चहाची गोडी लागली की मुले रोजच चहा मागू लागतात. पण तुम्हीही तुमच्या मुलांना अशा पद्धतीने चहा देत असाल तर वेळीच थांबा. कारण याचा त्यांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
आहारतज्ज्ञांच्या मते 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अजिबात चहा देऊ नये. चहामध्ये मुलांच्या वाढीसाठी कोणतेही पोषणमूल्य नसते, उलट त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. harlenezhealthclinic या आरोग्य संस्थेने याबाबत सविस्तर माहिती शेअर केली आहे.
लहान मुलांना चहा देण्याचे 4 मोठे दुष्परिणाम
1. लोहाची कमतरता आणि अशक्तपणा
चहामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो. हा घटक अन्नातील लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतो. त्यामुळे मुलांच्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. सतत चहा पिणारी मुले अनेकदा अॅनिमिक म्हणजेच अशक्त दिसतात. त्यांचा चेहरा फिकट पडतो आणि थकवा जाणवतो.
2. डिहायड्रेशनचा त्रास वाढतो
लहान मुले मुळातच खेळण्याच्या नादात पाणी कमी पितात. त्यामुळे त्यांना आधीच डिहायड्रेशनचा त्रास असतो. त्यात चहा प्यायल्याने वारंवार लघवीला जावे लागते आणि शरीरातील पाणी आणखी कमी होते. चहामध्ये असलेल्या काही घटकांमुळे ही समस्या आणखी वाढते.
3. झोप न येणे आणि चंचलपणा वाढणे
चहामध्ये काही प्रमाणात कॅफिन असते. मोठ्या माणसांसाठी हे प्रमाण कमी असले तरी लहान मुलांसाठी ते जास्त असते. त्यामुळे मुले अस्वस्थ होतात, रात्री लवकर झोप येत नाही, सतत चुळबुळ करणे किंवा एन्झायटी सारखे त्रास दिसू लागतात.
4. लहान वयातच अॅसिडिटीचा त्रास
चहामधील काही घटकांमुळे लहान मुलांना कमी वयातच पोटात जळजळ होणे आणि अॅसिडिटीचा त्रास सुरू होतो. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास हा त्रास आणखी वाढतो. यामुळे मुलांची भूक कमी होते आणि त्यांच्या वाढीवर परिणाम होतो.
त्यामुळे आहारतज्ज्ञ सांगतात की मुलांना चहा देणे पूर्णपणे टाळावे. चहा ऐवजी त्यांना कोमट दूध, ताज्या फळांचा रस किंवा सूप द्यावे. जर मुलाला गरमी हवी असेल तर हळद घातलेले दूध हा सर्वात उत्तम पर्याय आहे.