मुलं मोबाइल हिसकावल्यावर हिंसक होत आहेत ? पालकांनो, ओरडून नाही, या 4 पद्धतीने सोडवा व्यसन - टॉप न्यूज मराठी

किशोरवयीन मुलांमध्ये मोबाइलचे व्यसन झपाट्याने वाढत आहे आणि त्यातून ते हिंसक वर्तन करू लागल्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा वेळी पालकांनी मोबाइल हिसकावून घेण्यापेक्षा समजूतदारपणे वागणे गरजेचे आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

मानसशास्त्रज्ञ निराली भाटिया यांच्या मते, मोबाइलचे व्यसन ही केवळ वाईट सवय नाही, तर ती एक मानसिक गुंतागुंत आहे. अनेक मुलांसाठी तणाव आणि एकटेपणातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे मोबाइल असतो. तो अचानक हिसकावून घेतल्यावर त्यांचा मानसिक आधारच काढून घेतल्यासारखे वाटते. त्यामुळे ते हिंसक प्रतिक्रिया देतात. हा प्रश्न वर्चस्वाच्या लढाईत बदलतो.

मुलांमध्ये स्वनियंत्रण कसे विकसित कराल ?

तज्ज्ञांच्या मते, बाह्य दबाव टाकण्यापेक्षा मुलांमध्ये स्वनियंत्रण विकसित करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलाला सतत हे करू नको असे सांगण्यापेक्षा जास्त मोबाइल वापरल्याने मन आणि शरीरावर काय परिणाम होतो, हे त्याला समजावून सांगा. हे एका दिवसाचे काम नाही, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.

नियम बनवताना मुलांना सहभागी करून घ्या. स्क्रीन टाइम किती असावा, कोणते नियम पाळायचे हे ठरवताना त्यांचेही मत घ्या. निर्णय प्रक्रियेत सहभागी झाल्यावर मुले जबाबदारीने नियम पाळतात. फक्त स्क्रीन काढून टाकणे हा उपाय नाही. मुलांचा मेंदू लहानपणापासून वेगवान मनोरंजनाला सरावलेला असतो, त्यामुळे खरे जग त्यांना कंटाळवाणे वाटते. त्यासाठी त्यांना मैदानी खेळ, प्रत्यक्ष संवाद आणि सृजनशील गोष्टींकडे वळवा. मेंदूला नैसर्गिक आनंद मिळेल असे पर्याय द्या.

कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला ?

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मीता दोषी सांगतात, जेव्हा मुलगा झोप, जेवण आणि अभ्यास सोडून दिवसभर फोनमध्ये असतो, फोन जवळ नसल्यावर प्रचंड चिडचिड करतो, एकांतात जाऊन फोन वापरतो आणि घरच्यांशी खोटे बोलतो, तेव्हा ते व्यसनाचे गंभीर लक्षण आहे. अशा वेळी मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मुलाला ऑनलाइन जगापासून पूर्णपणे तोडण्यापेक्षा त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आणि चांगला शैक्षणिक कंटेंट पाहायला शिकवणे अधिक फायदेशीर ठरेल.