पिंपरी चिंचवड: श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळा आणि विविध सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश 8 डिसेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहेत. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1)(3) नुसार हे आदेश काढण्यात आले आहेत.
या काळात कोणताही दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बाळगण्यास बंदी आहे. दगड, शस्त्रे, अस्त्रे, काचेचे तुकडे, काचेच्या रिकाम्या बाटल्या, शारीरिक इजा करण्यासाठी वापरली जाईल अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, नेत्यांच्या चित्राचे प्रदर्शन किंवा दहन करण्यास बंदी आहे.
मोठमोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजवणे, सभ्यता किंवा नीतिमत्तेला धोका पोहोचेल अशा पद्धतीने आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास बंदी आहे. पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय सभा घेता येणार नाही किंवा मिरवणूक काढता येणार नाही.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी सांगितले आहे.