राजकारण : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत एक 32 मिनिटांची ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा उल्लेख असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही.
व्हायरल क्लिपमध्ये नेमके काय आहे -
मनोज जरांगे यांनी भर पत्रकार परिषदेत जी क्लिप ऐकवली त्यात तीन ते चार व्यक्तींचे आवाज आहेत. हे आवाज नेमके कुणाचे आहेत यावर आता चर्चा सुरू झाली आहे. क्लिपमध्ये हिंदी आणि मराठी मिश्र भाषेत संभाषण सुरू आहे. त्यातील महत्त्वाचे वाक्य असे आहे.
जरांगे पाटील को ऑलरेडी 500 करोड रुपये पहुँच चुके है, श्रीकांत शिंदे के पास से पहुँच चुके है. जरांगे पाटील विधानसभा चुनाव मे हमारे फायदे का रहेगा या नहीं रहेगा, इससे मेरा मत अलग है, कॅल्क्युलेशन अलग है. आप जो सोचते है, जो तथ्य है वो तो है ही.
याचाच अर्थ असा की जरांगे पाटील यांना आधीच 500 कोटी रुपये पोहोचले आहेत आणि ते श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत पोहोचले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत जरांगे यांचा फायदा होईल की नाही यावर त्यांच्यात वेगळे मत आणि कॅल्क्युलेशन असल्याचेही त्या संभाषणातून ऐकू येते.
जरांगेंचा थेट सवाल एकनाथ शिंदेंना -
या क्लिपच्या आधारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. जरांगे म्हणाले की एकनाथ शिंदे साहेब तुम्ही दिल्लीतील भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल काय सांगितले. मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचेत आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन मला दिलेत असे तुम्ही भाजपच्या नेत्याला सांगितले का, कारण ते नेते आता कुजबुज करायला लागले आहेत.
मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या हाताने 500 कोटी रुपये पोहोचलेत, जरांगे पाटील आपला थर्ड पर्सन आहे असे शिंदे साहेब तुम्ही म्हणालात का. तुम्ही मला 500 कोटी रुपये दिले का. जर तुम्ही मला दिले नसतील तर मग भाजप तुम्हाला संपवतोय की तुम्ही मला संपवताय याचा छडा मी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही.
जरांगे यांनी पुढे एक मोठे विधान केले. ते म्हणाले की मी जर उद्या सकाळी मराठा समाजाला सांगितले की 100 रुपये टाका तर उद्या माझ्याकडे 2500 कोटी जमा होतील. हा लहान विषय नाही शिंदे साहेब. तुमचा माझा सामना तीन महिन्यानंतर होईल असा इशाराही त्यांनी दिला.
शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया आली -
या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी कुणालाही 500 कोटी दिले नाहीत किंवा घेतले नाहीत. जरांगे पाटील यांनी शहानिशा करून बोलावे असे शिंदे यांनी म्हटले आहे. जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत, त्याची चौकशी झाली पाहिजे, मग दूध का दूध पानी का पानी होईल असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
त्याचवेळी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनीही या क्लिपवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की जर मनोज जरांगे यांनी सादर केलेली ऑडिओ क्लिप खरी असेल तर ही खूप गंभीर बाब आहे. ऑडिओ क्लिप कोणी व्हायरल केली, त्याची चौकशी झाली पाहिजे. जर क्लिप खरी असेल तर भाजपने स्पष्टीकरण द्यावे. ऑडिओ क्लिपची आणि त्यातील आवाजाची चौकशी करा, त्यानंतरच सत्य बाहेर येईल.
एकूणच 500 कोटींच्या या ऑडिओ क्लिपने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले असून या क्लिपमधील आवाज कुणाचे आणि व्यवहार खरा आहे की राजकीय षडयंत्र हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.