सेवा संकल्प अभियानांतर्गत कातकरी समाजातील 310 लाभार्थ्यांना जातीचे दाखले व रेशनकार्डचे वितरण - टॉप न्यूज मराठी

पुणे : जनजाती कल्याण आश्रम आणि सेवा सहयोग फाउंडेशन, पुणे यांच्या प्रयत्नातून तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव, तहसील कार्यालय खेड आणि पंचायत समिती खेड यांच्या समन्वयातून विठ्ठलवाडी येथे ३१० लाभार्थ्यांना जातीचे दाखले व रेशनकार्डचे वितरण करण्यात आले.

खेड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रेशनकार्ड व जातीचे दाखले वितरित करण्यात आले.या उपक्रमामुळे कातकरी समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजना व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्यास मदत झाली.

नाशिक जनजाती कल्याण आश्रमाचे सचिव शरद शेळके, प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रियंका घनवट, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगावचे वरिष्ठ आदिवासी निरीक्षक शरद काळे, जनजाती कल्याण आश्रमाचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ चौरे उपस्थित होते.

श्री. शेळके यांनी मार्गदर्शनात हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदानाचा तसेच आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा उल्लेख केला. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृतींना अभिवादन करत आदिवासी समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. उमा वाघ यांनी केले, तर घोडेगाव आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल रेणुका जाधव यांनी आभार मानले.

कार्यक्रमास अरुण काठे, शिवाजी चौरे, कैलास भालेकर, रेखा मराडे, योगेश चपटे, श्री. नितीन खरात, चिंतामण वडेकर, तुकाराम भांगरे, आदित्य जोशी,  यांच्यासह जनजाती कल्याण आश्रमाचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.