पिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे 31 ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करा ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश - टॉप न्यूज मराठी

पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित २२ कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवून पूर्ण करावीत. मिशन मोडवर कामे हाती घेऊन प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. 

पुणे नाशिक महामार्गावरील भूसंपादन व वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी

सोडविण्याच्या अनुषंगाने आमदार महेश लांडगे यांनी दिलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे तसेच पिंपरी चिंचवड येथील विशेष भूसंपादन अधिकारी, विशेष घटक क्रमांक १ व २, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने डीपी रोडमधील मिसिंग लिंकच्या भूसंपादनासाठी ३० टक्के रक्कम भरण्याची तरतूद करावी. तसेच भूसंपादन प्रक्रियेसाठी मोजणीची तारीख निश्चित करून सर्व ठिकाणची मोजणी एकाच दिवशी पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करावे. सर्वांना जमिनी ताब्यात देण्यासाठी देण्यात आलेली वेळेची मर्यादा पाळा.

भूसंपादनाशी संबंधित सर्व बाबींचे समन्वयाने नियोजन करून मोजणी करावी. प्रलंबित कामांचा नियमित आढावा घेऊन अडथळे तातडीने दूर करावेत, जेणेकरून डीपी रोड मिसिंग लिंकची कामे वेळेत मार्गी लागतील. महानगरपालिका आणि संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यास पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास मोठी मदत होईल, असे श्री. लांडगे यांनी सांगितले.

बैठकीत मौजे चऱ्होली, डुडुळगाव, दिघी, तळवडे, बोराडेवाडी, मोशी, चोवीस, चिखली, वडमुखवाडी येथील भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.