पुण्यातील एका बिल्डरचा आणि त्याच्या साथीदारांचा मोठा प्रताप समोर आलाय.
वडगाव शेरी येथील प्लॉटमध्ये कम्पाऊंटचं गेट तोडून आत शिरून सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली.
एवढेच नाही तर ट्रॅक्टर, डंपरसह या प्लॉटवर 30 ते 40 जणांनी ताबा मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, रुपेश ढाकलिया, राज ढाकलियासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रवींद्र हिरालाल दुगड यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर 30 मध्ये 7 मे रोजी सायंकाळच्या दरम्यान घडला.
रवींद्र दुगड यांचा दुगड ग्रुप नावाने कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. वडगाव शेरी सर्वे नंबर 30 मध्ये त्यांच्या मालकीच्या जागेत सर्व परवानग्यानुसार त्यांनी इमारतीचं बांधकाम सुरू केलं.
मात्र 7 मेला सुपरवायझर विशाल पवार याने फोन करुन कळवलं की, अमित लुंकड,
राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया, बिडकर, अमित लुंकडचा मॅनेजर व इतर 30 ते 40 जण, 8-10 ट्रॅक्टर, दोन तीन डंपर, वॉटर टॅकर घेऊन आले.
त्यांनी साईटच्या समोरील दोन्ही गेटचे पत्रे तोडले आहेत. व त्यांची सर्व वाहनं प्लॉटमध्ये घुसवली. त्यानंतर फिर्यादी व पोलीसही तेथे आले.
तेव्हा अमित लुंकड याने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादींना मारण्याच्या धमक्या देऊन तिथून निघुन जायला सांगितलं. तसेच तो प्लॉट त्यांचा असल्याचा दावा केला.
त्यांनी एका सुरक्षारक्षकाला देखील मारहाण केली. त्यामुळेच प्लॉटचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून याआधी देखील अमित लुंकड यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत अनेकांनी तक्रारी दिल्याचं समोर आलं आहे.