पुणे: जुन्या वाहनांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता 30 जूनपर्यंत वाहनधारकांना ही नंबर प्लेट बसवता येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी अनेक वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवली नव्हती. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. सर्व वाहनधारकांनी विहित मुदतीत नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
एचएसआरपी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ही प्लेट सहज बदलता येत नाही. यावर युनिक नंबर, होलोग्राम आणि इंजिन नंबर असतो. चोरीला गेलेले वाहन शोधणे, बनावट नंबर प्लेट रोखणे यासाठी ही प्लेट महत्त्वाची आहे. मुदतीत प्लेट न बसवल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वाहनधारकांनी अधिकृत वेबसाइटवरून किंवा डीलरकडे जाऊन नोंदणी करून वेळेत प्लेट बसवून घ्यावी, असेही परिवहन विभागाने सांगितले आहे.