धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी मारून राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह आत्महत्या केली आहे. या घटनेत अश्विनी आणि त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर धाराशिवच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी आपल्या तीनही मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावर गेल्या होत्या. आत्महत्येच्या आधी त्यांनी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या मुलांसोबत केक कापला. हा त्यांचा शेवटचा आनंद होता. कोणीतरी हा व्हिडिओ पाहिला असेल, पण कोणालाच कल्पना नव्हती की काही वेळातच त्या इतके टोकाचे पाऊल उचलतील. केक कापून झाल्यावर त्या थेट उपळी बुरुजावर गेल्या आणि तिथून तिन्ही मुलांसह खाली उडी मारली. हा बुरूज सुमारे 100 फूट उंच आहे.
या प्रकरणात आता धाराशिव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अश्विनी यांचे पती मनोहर पौळ, सासू कालिंदा पौळ, सासरे अंकुश पौळ आणि पतीची आत्या विमलाबाई यांच्या विरोधात छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सासरच्या लोकांकडून अश्विनी यांचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. त्यांना सतत टोमणे मारले जायचे.
एफआयआरमधून समोर आलेली माहिती अंगावर शहारा आणणारी आहे. या त्रासाला कंटाळूनच अश्विनी यांनी स्वतःच्या हिंमतीवर सप्टेंबर 2024 मध्ये मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये नोकरी मिळवली होती. एक मुलगी माहेरी ठेवून त्या पती आणि दोन मुलांसह मुंबईला राहत होत्या. पण तिथेही पती त्यांच्यावर संशय घ्यायचा. तू नोकरीच्या नावाखाली कुठे जाते, एवढा वेळ बाहेर का राहते असे म्हणून त्यांना रोज त्रास दिला जायचा. या सगळ्या गोष्टी अश्विनी फोनवरून आपल्या माहेरी सांगायच्या. अखेर या सततच्या त्रासाला आणि संशयाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
अश्विनी पौळ या धाराशिव जिल्ह्यातील एक नावाजलेल्या राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू होत्या. कुस्तीमध्ये त्यांनी अनेक पदके मिळवली होती. त्यांच्या जिद्दीच्या जोरावरच त्यांनी सुरक्षा दलामध्ये नोकरी मिळवली होती. एक धाडसी खेळाडू असूनही सासरच्या जाचापुढे त्यांना हार मानावी लागली, याचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे.