आयुर्वेदानुसार आहार आणि निद्रा हे निरोगी आयुष्याचे दोन मुख्य स्तंभ मानले जातात. रात्रीचे जेवण आणि झोप यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. चुकीच्या वेळी जेवणे किंवा चुकीच्या पद्धतीने झोपणे यामुळे पचन बिघडून अनेक आजार उद्भवू शकतात. रात्रीचे जेवण कधी आणि कसे करावे, याबद्दल आयुर्वेदात काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत.
1. रात्रीच्या जेवणाची वेळ कोणती असावी
आयुर्वेदानुसार सूर्यास्तानंतर 1 ते 2 तासांच्या आत जेवणे उत्तम मानले जाते. शक्यतो रात्री 7 ते 8 च्या दरम्यान जेवण उरकावे. रात्री उशिरा जेवल्याने अन्नाचे पचन नीट होत नाही, ज्यामुळे शरीरात आम म्हणजेच विषारी घटक तयार होतो. त्यामुळे वजन वाढणे, गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या सुरू होतात.
2. रात्रीचा आहार कसा असावा
रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणापेक्षा हलके असावे. मुगाची खिचडी, सूप किंवा कढण यांसारखे पदार्थ उत्तम मानले जातात. रात्री दही खाणे आयुर्वेदात निषिद्ध मानले जाते, कारण ते कफ वाढवते आणि शरीरातील स्त्रोतसांमध्ये अडथळा निर्माण करू शकते. पोट पूर्ण भरण्याऐवजी थोडे रिकामे ठेवावे. पोटाचा 1/4 भाग हवेसाठी मोकळा असावा, असा आयुर्वेदाचा नियम आहे.
3. जेवण आणि झोप यात किती अंतर ठेवावे
जेवल्यानंतर लगेच झोपू नये. जेवण आणि झोप यामध्ये किमान 3 तासांचे अंतर असावे. यामुळे अन्न पचायला पुरेसा वेळ मिळतो. जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी किमान 100 पावले संथ गतीने चालावे. याला शतपावली म्हणतात. यामुळे पचनक्रिया सुधारते.
4. झोपण्याची योग्य पद्धत कोणती
रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. याला वामकुक्षी म्हणतात. यामुळे जठराग्नी प्रदीप्त राहतो आणि पचन नीट होते. रात्री 10 वाजेपर्यंत झोपणे उत्तम. रात्री 10 ते 2 ही वेळ पित्त काळाची असते, ज्यामध्ये शरीर अंतर्गत पचन आणि दुरुस्तीचे काम करते. त्यामुळे या वेळेत झोपणे गरजेचे आहे.
काय करावे, काय टाळावे
कोमट पाणी प्यावे. रात्री थंड किंवा फ्रीजमधील पदार्थ खाऊ नका. जेवण शांतपणे चावून खावे. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पाहू नका. झोपण्यापूर्वी अर्धा तास स्क्रीन बंद ठेवा. रात्री खूप तिखट किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका.
टीप - रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध हळद टाकून घेतल्यास शांत झोप लागण्यास मदत होते.
वरील माहिती आयुर्वेदिक माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.