पर्यटन विशेष : दिवाळीच्या सुट्टीत कोकणात जायचा प्लॅन करताय, 3 हजारात राहणे जेवण आणि समुद्रकिनारा कसा फिरायचा, बघा कमी बजेटचा भन्नाट प्लॅन - टॉप न्यूज मराठी

पर्यटन विशेष : दिवाळीची सुट्टी म्हटली की सगळ्यांना वाटते कुठेतरी फिरायला जावे. पण गोवा किंवा महाबळेश्वरचे बजेट खूप जास्त असते. त्यापेक्षा कमी गर्दीचे आणि कमी बजेटचे ठिकाण म्हणजे कोकण. दिवाळीमध्ये कोकणात खूप प्रसन्न वातावरण असते. समुद्र शांत असतो आणि गर्दीही कमी असते. फक्त 3 हजार रुपयात तुम्ही दोन दिवस कोकण कसे फिरू शकता याचा प्लॅन बघूया.

ठिकाण कोणते निवडावे

जास्त लांब जायचे नसेल तर अलिबाग, दिवेआगार किंवा श्रीवर्धन हे बेस्ट आहे. पुण्यातून जायचे असेल तर हरिहरेश्वर आणि दिवेआगार हा एक दिवसाचा प्लॅन होऊ शकतो. मुंबईतून असाल तर अलिबाग जवळ पडेल. आम्ही इथे दिवेआगारचा प्लॅन सांगतो आहे जो सगळ्यांसाठी सोयीचा आहे.

पहिला दिवस - प्रवास आणि समुद्र

पुण्यातून सकाळी 6 वाजता एसटी पकडा. पुणे ते दिवेआगार एसटीचे तिकीट सुमारे 400 ते 450 रुपये आहे. दुपारी 12 पर्यंत तुम्ही दिवेआगारला पोहोचाल. तिथे समुद्र किनाऱ्याजवळच होमस्टे मिळतात. दिवाळीमध्ये मोठ्या हॉटेलचे दर वाढलेले असतात पण लोकल होमस्टे 800 ते 1000 रुपयात दोन लोकांसाठी मिळतो. त्यामध्ये सकाळचा चहा आणि नाष्टा असतोच.

दुपारी होमस्टेमध्येच जेवण करा. कोकणी पद्धतीचे मासे भात किंवा व्हेज थाळी 150 रुपयात मिळते. जेवण करून संध्याकाळी दिवेआगारचा समुद्रकिनारा फिरा. इथला बीच खूप स्वच्छ आणि शांत आहे. संध्याकाळी सुवर्ण गणेश मंदिरात जा. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे.

दुसरा दिवस - श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून श्रीवर्धन बीचवर जा. दिवेआगार ते श्रीवर्धन फक्त 20 मिनिटांवर आहे. रिक्षा 100 रुपयात जाते. सकाळचा नाष्टा तिथल्या टपरीवर करा. घावन चटणी किंवा मिसळ फक्त 50 रुपयात मिळते.

त्यानंतर हरिहरेश्वरला जाण्यासाठी बोट पकडा. बोटीचे तिकीट 50 रुपये आहे. हरिहरेश्वर येथे कालभैरव मंदिर आणि समुद्र एकाच ठिकाणी आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत दर्शन करून परत दिवेआगारला या आणि पुण्याकडे येणारी 4 वाजताची एसटी पकडा.

एकूण खर्चाचा हिशेब

येणे जाणे एसटी - 900 रुपये

होमस्टे एक दिवस - 1000 रुपये, दोघे असाल तर 500 रुपये प्रत्येकी

जेवण आणि नाष्टा 4 वेळा - 500 रुपये

रिक्षा आणि बोट - 200 रुपये

इतर खर्च - 300 रुपये

म्हणजे एका व्यक्तीचा एकूण खर्च 2500 ते 3000 रुपयात आरामात होतो. जर तुम्ही मित्रांसोबत ग्रुपने गेलात तर हा खर्च अजून कमी होईल.

कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी टीप

1. हॉटेल बुक करताना गुगलवर नाही तर तिथल्या लोकल लोकांना कॉल करा, नंबर युट्यूबवर मिळेल.

2. जेवण नेहमी होमस्टेमध्येच करा, बाहेर हॉटेलमध्ये महाग असते.

3. दिवाळीत गर्दी वाढण्यापूर्वी म्हणजे दिवाळीच्या 4 दिवस आधी बुकिंग करा.

4. बीचवर प्लास्टिक टाकू नका आणि मद्यपान करू नका, कोकणातील लोक याबाबत खूप कडक आहेत.

या दिवाळीत फटाके आणि प्रदूषणापेक्षा समुद्राची हवा खाऊन या, मन प्रसन्न होईल आणि खिशालाही जास्त झळ बसणार नाही.