महाराष्ट्राला अभिमान असलेल्या अजिंठा लेण्या सगळ्यांनी पाहिल्या असतील. पण लेणी क्रमांक 24 च्या मागे असलेल्या एका बंद भिंतीमागे काय आहे हे आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. स्थानिक लोक त्या भिंतीला शापित भिंत म्हणतात आणि पुरातत्व खात्याचे लोक त्या विषयावर बोलणे टाळतात. या भुयाराची गोष्ट 1982 सालची आहे.
1982 च्या पावसाळ्यात अजिंठा लेण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साफसफाई आणि दुरुस्तीचे काम सुरू होते. पुरातत्व विभागाचे दिल्लीहून आलेले तीन अभ्यासक आणि दोन स्थानिक मजूर लेणी क्रमांक 24 मध्ये काम करत होते. ही लेणी अपूर्ण आहे, त्यामुळे तिथे पर्यटक जास्त जात नाहीत.
काम करताना एका मजुराच्या टिकाव एका भिंतीवर आदळला आणि भिंतीतून टण असा वेगळा आवाज आला. ती भिंत पोकळ असल्याचे लक्षात आले. अभ्यासकांनी तिथली माती काढली तेव्हा तिथे एक छोटा दरवाजा असल्याचे दिसले. तो दरवाजा दगडातच कोरलेला होता आणि त्यावर ब्राह्मी लिपीत काहीतरी लिहिलेले होते. मजुरांनी तो दरवाजा उघडण्यास नकार दिला, कारण गावात आधीपासूनच कथा होती की त्या लेणीच्या मागे दुसरे जग आहे, तिथे गेलेला परत येत नाही.
पण तीनही अभ्यासक खूप उत्साही होते. त्यांना वाटले की हे मोठे संशोधन असेल. त्यांनी टॉर्च, दोर आणि कॅमेरा घेतला आणि दुपारी 3 वाजता त्या भुयारात प्रवेश केला. मजुरांना बाहेर थांबायला सांगितले.
पहिला तास आतून टॉर्चचा प्रकाश दिसत होता. नंतर प्रकाश हळू हळू खोल जात गेला आणि अचानक बंद झाला. मजुरांना वाटले की बॅटरी संपली असेल. त्यांनी बराच वेळ वाट पाहिली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोणीच बाहेर आले नाही. मजुरांनी घाबरून वर अधिकाऱ्यांना कळवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी औरंगाबादहून पुरातत्व विभागाची मोठी टीम आली. पोलिसही आले. त्यांनी त्या दरवाजातून आत डोकावून पाहिले. आत फक्त 20 फुटापर्यंत पायऱ्या दिसत होत्या, पुढे अंधार होता. आतून थंड हवा येत होती आणि एक विचित्र कुबट वास येत होता. एका जवानाने आत दगड टाकला तर त्याचा आवाजच आला नाही, जणू खाली खूप खोल दरी आहे.
सरकारने दोन दिवस शोध मोहीम राबवली. पण कोणीही आत जायला तयार होईना. शेवटी वरून आदेश आला की हे प्रकरण दाबून टाका. त्या दरवाजावर परत चुन्याचा प्लास्टर करून तो बंद करण्यात आला.
आज जर तुम्ही अजिंठा लेणी क्रमांक 24 मध्ये गेलात तर एका कोपऱ्यातील भिंतीचा रंग इतर भिंतीपेक्षा वेगळा दिसतो. तिथले गाईड पर्यटकांना तिथे जास्त वेळ थांबू देत नाहीत. स्थानिक आदिवासी लोक सांगतात की अमावस्येच्या रात्री त्या बंद भिंतीमधून कधी कधी प्रकाश येतो आणि आतून घंटाचा आवाज येतो.
काही इतिहासकार सांगतात की ते भुयार बौद्ध भिक्षूंनी ध्यानासाठी बनवले होते आणि ते थेट वाघूरा नदीच्या पात्रापर्यंत जाते. तर काही लोक म्हणतात की तिथे एक गुप्त खजिना आहे, त्याचे रक्षण करण्यासाठीच तिथे कोणी जाऊ शकत नाही.
पुरातत्व खात्याने आजपर्यंत त्या भुयाराबद्दल एकही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे प्रश्न आजही अनुत्तरित आहे. त्या तीन अभ्यासकांचे काय झाले, ते भुयार नक्की कुठे जाते आणि सरकारने ते कायमचे का बंद केले. ही कथा अजिंठ्याच्या गावात आजही दबक्या आवाजात सांगितली जाते.