मुंबई : कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टर आणि नर्सला मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे याच्यासह सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीन देताना कोर्टाने कठोर अटी घातल्या आहेत.
जामीन मंजूर करताना मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले की, पुढील आदेशापर्यंत सर्व आरोपींना महाराष्ट्राबाहेर राहावे लागेल. या अटीनुसार रमेश म्हात्रे आता आरोपपत्र दाखल होईपर्यंत गोव्यात राहणार आहे. त्याचा मुक्काम गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाझरी रिसॉर्टमध्ये असेल, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी कोर्टात दिली.
1. सर्व आरोपींना आठवड्यातून 3 वेळा ते ज्या ठिकाणी राहतील त्या परिसरातील स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक आहे.
2. सर्व आरोपींना त्यांचे पासपोर्ट कोर्टात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
3. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जाणार आहे. सुनावणीच्या दरम्यान आरोपींच्या वकिलांना एकही दिवस तारीख पुढे ढकलण्याची मागणी करता येणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले.
4. खटला पूर्ण होईपर्यंत सरकारी वकील बदलता येणार नाहीत.
आरोपींना कोर्टात व्हिसीद्वारे हजर राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यावर कोर्टाने "ही व्हीआयपी ट्रीटमेंट आहे का?" असा सवाल केला. मात्र आरोपी प्रत्यक्ष हजर राहू शकत नसतील तर रीतसर अर्ज करून एखाद्या वेळेस व्हिसीद्वारे हजर राहण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काम करणारे हे पीडित डॉक्टर आहेत. खटल्याच्या सुनावणीसाठी त्यांना कोर्टात जावे लागल्यास कामावर गैरहजर राहिल्यास केडीएमसी त्यांच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करणार नाही, अशी ग्वाही केडीएमसीच्या वकिलांनी कोर्टात दिली. सध्या हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात गेल्याने लवकरच यावर सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.