'गाडी हळू चालव' म्हटल्याचा राग पुण्यात 3 वर्षांच्या चिमुकल्यासह पती-पत्नीला रस्त्यातच मारहाण - टॉप न्यूज मराठी

पुण्यात एका दुचाकी चालकाला आणि त्याची पत्नी व तीन वर्षांच्या चिमुकल्याला मारहाण करण्यात आली. केवळ गाडी हळू चालव म्हटल्याच्या रागातून वॅगनर गाडीमध्ये असलेल्या चौघांनी मारहाण केली. मारहाणी नंतर घाबरलेल्या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर या घटनेमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था राबवणाऱ्या पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

वाघोली परिसरात किरकोळ वाहन धडकेतून सुरू झालेला हा वाद थेट मारहाण आणि धमक्यांपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी शंतनु शुक्ला हे पत्नी आणि मुलासह खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून ते दुचाकीवरून घरी परतत असताना खराडीच्या दिशेनं भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या वॅगनर कारने त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यानंतर शुक्ला यांनी “गाडी हळू चालवा” असं सांगितल्याचा राग आल्यानं कारचालकानं शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूनी शाब्दिक वाद वाढल्यानंतर  तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. कारचालकानं आव्हाळवाडी फाट्याजवळ अचानक कार दुचाकीसमोर आडवी लावली. त्यानंतर “तुला इथेच कापून टाकतो” अशी धमकी देत शंतनु शुक्ला त्यांची पत्नी या दोघांनाही मारहाण केल्याचा आरोप आहे. या झटापटीत तीन वर्षांच्या चिमुकल्यालाही दुखापत झाली. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी वॅगनर कारमधील चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र आपल्याला लवकर न्याय मिळावा अशी मागणी पीडित कुटुंबांनं केली आहे.