जिओच्या दमदार एन्ट्रीने रिलायन्स देशातील नंबर वन उद्योगसमूह, बाजारमूल्य 28.9 लाख कोटींवर, टाटा आणि अदाणीला टाकले मागे - टॉप न्यूज मराठी

मुंबई - शेअर बाजारात जिओ प्लॅटफॉर्म्सने केलेल्या दमदार पदार्पणामुळे देशातील सर्वाधिक मूल्यवान उद्योगसमूहांच्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. बुधवारी जिओचा समभाग 1358 रुपयांवर सूचीबद्ध होताच रिलायन्स समूहाने टाटा समूहाला मागे टाकत देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहाचे स्थान पटकावले आहे.

जिओच्या सूचिबद्धतेनंतर रिलायन्स समूहातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 28.9 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. टाटा समूह 25.6 लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या, तर अदाणी समूह 16.6 लाख कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.

जिओच्या या दमदार पदार्पणामुळे रिलायन्स समूहाच्या बाजारमूल्यात मोठी भर पडली आहे. प्रति समभाग 1119 रुपये इश्यू प्राइस असलेल्या जिओचा समभाग 1358 रुपयांवर सूचीबद्ध झाला. म्हणजेच, इश्यू प्राइसच्या तुलनेत त्याने 21.4 टक्के प्रीमियम नोंदवला. या किमतीनुसार जिओचे बाजार भांडवल 12.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्स यांचे एकत्रित बाजारमूल्य 28.7 लाख कोटी रुपये झाले आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या भागधारकांची संख्याही देशात सर्वाधिक आहे. कंपनीचे एकूण 79.8 लाख भागधारक आहेत.

मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे जिओच्या सूचिबद्धतेनिमित्त पारंपरिक घंटानाद समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी उपस्थित होते. सूचिबद्धतेपूर्वी आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी म्हणाले, आजची सूचिबद्धता हा अंतिम टप्पा नसून एका नव्या सुरुवातीचा क्षण आहे. आम्ही पारदर्शकपणे संवाद साधू, दिलेली आश्वासने पूर्ण करू आणि आमच्या कामातून तुमचा विश्वास संपादन करू.

या सूचिबद्धतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाजार भांडवलाच्या दृष्टीने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्स या देशातील अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक मूल्यवान सूचिबद्ध कंपन्या बनल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्यच टाटा समूहातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलापेक्षा 3.1 लाख कोटी रुपयांनी अधिक आहे. अशा प्रकारे, जिओच्या पदार्पणामुळे देशातील सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांबरोबरच प्रमुख उद्योगसमूहांच्या क्रमवारीतही बदल झाला आहे.

ही तुलना संबंधित उद्योगसमूहांतील सूचिबद्ध कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलाच्या आधारे करण्यात आली आहे. रिलायन्स समूहाच्या बाजार भांडवलाची गणना करताना जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा समावेश करण्यात आलेला नाही.