बारामतीकरांनो लक्ष द्या, 28 आणि 29 नोव्हेंबरला मॅरेथॉनमुळे अनेक रस्ते राहणार बंद, घराबाहेर पडण्याआधी वाचा पर्यायी मार्ग - टॉप न्यूज मराठी

बारामती: बारामती पॉवर मॅरेथॉनमुळे 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी बारामती शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. शनिवारी 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून रविवारी 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत किंवा स्पर्धा संपेपर्यंत काही प्रमुख मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

मॅरेथॉनची सुरुवात रेल्वे स्टेशन ग्राउंड, भिगवण रोड बारामती येथून होणार आहे. तिथून पेन्सिल चौक, विमानतळ मार्ग, भारत फोर्ज, फरेरो कंपनी ते कटफळ स्टेशन येथून यू टर्न घेऊन परत रेल्वे स्टेशन ग्राउंडवर स्पर्धा संपणार आहे.

कोणते रस्ते बंद राहणार: तीन हत्ती चौक, पेन्सिल चौक ते मेडिकल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या चौकापर्यंतचा दोन्ही बाजूंचा मुख्य रस्ता बंद राहणार आहे. मेडिकल कॉलेज चौक ते फरेरो कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पियाजो कंपनीच्या बाजूकडील मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. तीन हत्ती चौक ते पंचायत समिती चौक, बारामती मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोड स्पर्धेच्या काळात बंद राहणार आहेत. या परिसरातील रहिवाशांसाठी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवरून वाहतूक सुरू राहील.

पर्यायी मार्ग कोणते: भिगवणकडे जाणारी आणि भिगवणकडून बारामतीकडे येणारी वाहतूक तीन हत्ती चौक, माळावरची देवी, जळोची आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या मार्गाने वळवण्यात येणार आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मागील बाजूने ग. दि. मा. सभागृह, अभिषेक कॉर्नर, रुईपाटी मार्गे वाहतूक जाईल. पाटस रस्त्यावरील देशमुख चौकाकडून येणारी वाहतूक रेल्वे उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर यू टर्न घेऊन रेल्वे रुळालगतच्या मार्गाने मेहता हॉस्पिटल, महिला हॉस्पिटल मार्गे एमआयडीसीकडे जाईल.

पाटस रोडवरील पालखी महामार्गावरून डावीकडे विमानतळाच्या बाजूने जाणाऱ्या वाहनांसाठी पालखी मार्ग, रेल्वे सर्कल आणि नवीन पालखी मार्गाचा पर्याय दिला आहे. भिगवण रोडवरून पाटसकडे जाणारी वाहतूक नवीन पालखी मार्ग, रेल्वे सर्कल आणि पुढील चारपदरी पालखी मार्गाने जाईल.

नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.