प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वयाच्या 28 व्या वर्षी निधन, लग्नानंतर अवघ्या महिन्याभरात घडली धक्कादायक घटना - टॉप न्यूज मराठी

मल्याळम सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांचे वयाच्या 28 व्या वर्षी निधन झाले आहे. शनिवारी 17 ऑक्टोबर रोजी कोचीमधील एका हॉटेलच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. नुकतीच त्यांची पहिली वेब सीरिज रिलीज झाली होती आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलराज कलारिकल हे कोट्टायममधील मनिमाला येथील रहिवासी होते. ते कामानिमित्त कोचीमध्ये एका हॉटेलमध्ये थांबले होते. ते या शोचे दिग्दर्शक श्रीकांत यांच्यासोबत राहत होते. अनेकदा दरवाजा ठोठावूनही त्यांनी दरवाजा उघडला नाही, त्यानंतर खोलीत जाऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असावा असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेली कॉफी स्क्वॉड ही वेब सीरिज 15 ऑक्टोबरपासून हॉटस्टारवर रिलीज झाली होती. या सीरिजचे आतापर्यंत चार भाग प्रदर्शित झाले असून एकूण 36 भागांचे शूटिंग पूर्ण झाले होते. त्यांच्या निधनानंतर जिओहॉटस्टारने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बेलराज यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी साधारण महिन्याभरापूर्वीच लग्न केले होते. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 11 सप्टेंबर 2026 रोजी त्यांनी अथिरा बिंदू साबू हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर अवघ्या एका महिन्याच्या आतच त्यांचे असे अचानक जाणे त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि पत्नी अथिरासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबद्दल बोलायचे तर बेलराज कलारिकल हे फर्स्ट प्रिंट स्टुडिओज या निर्मिती संस्थेचे संस्थापक सदस्य होते. या संस्थेने पुरस्कार विजेता चित्रपट ओट्टामुरी वेलिचम आणि केरळ क्राईम फाइल्स या गाजलेल्या वेब सीरिजसारख्या प्रोजेक्टवर काम केले आहे. दिग्दर्शक होण्यापूर्वी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यांनी निझल, मधुरम आणि दाकिनी या सिनेमांमध्ये सहाय्यक म्हणून काम केले होते. याशिवाय त्यांनी राहुल रिजी नायर यांच्यासोबत दाकिनी, कीडम आणि खो खो या प्रोजेक्टमध्येही काम केले होते. कॉफी स्क्वॉड या वेब सीरिजच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते.