इमरान खानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, नेमके कारण काय - टॉप न्यूज मराठी

मुंबई पोलिसांनी अभिनेता इमरान खानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस दिली आहे. 10 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. हे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी करण्यात आले होते. मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी इमरान खानसह शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी इमरान खान परदेशी नागरिक असताना आंदोलनात कसा सहभागी झाला असा प्रश्न उपस्थित करत मुंबई पोलिस आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर गामदेवी पोलिसांनी एफआयआर क्रमांक 813 दाखल केला आणि हे प्रकरण एफआरआरओ म्हणजेच फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसकडे पाठवले. इमिग्रेशन अॅक्टच्या कलम 29 आणि 7 अंतर्गत ही नोटीस देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कोण आहे इमरान खान

इमरान खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे आणि तो सुपरस्टार आमिर खानचा भाचा आहे. जाने तू या जाने ना, आई हेट लव्ह स्टोरीज आणि दिल्ली बेली यांसारख्या हिट सिनेमांमध्ये त्याने काम केले आहे. तो मूळचा भारतीय नसून अमेरिकन नागरिक आहे. त्याचा जन्म अमेरिकेत झाला आहे. त्याच्याकडे ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया म्हणजेच ओसीआय कार्ड आहे, ज्यामुळे तो भारतात राहून काम करू शकतो. आंदोलनाच्या दिवशी पोलिस व्हॅनमधून त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत apparently I am going for a drive असे लिहिले होते. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला होता की मी एका नागरिक म्हणून, मुंबईकर म्हणून इथे आलो आहे, माझी कोणतीही मागणी नाही.

ओसीआय म्हणजे काय आणि नियम काय सांगतो

ओसीआय म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. हा भारत सरकारने भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना दिलेला एक विशेष दर्जा आहे. हा दुहेरी नागरिकत्व नाही. ओसीआय कार्डधारक परदेशी नागरिकच मानला जातो. त्याला भारतात आयुष्यभर राहण्याचा, काम करण्याचा आणि व्हिसा फ्री प्रवासाचा अधिकार मिळतो. पण त्याला राजकीय अधिकार मिळत नाहीत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 अंतर्गत भाषण स्वातंत्र्य आणि शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार फक्त भारतीय नागरिकांना आहे, ओसीआय धारकांना नाही. ओसीआय नियमात आंदोलनात सहभागी होण्यासाठी थेट बंदी असा उल्लेख नाही, पण राजकीय आंदोलन, सरकारविरोधी प्रचार किंवा देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा आणणारे कृत्य करणे हे परदेशी नागरिकांसाठी प्रतिबंधित मानले जाते. जर असा सहभाग आढळला तर सिटीझनशिप अॅक्टच्या कलम 7D अंतर्गत ओसीआय कार्ड रद्द करणे, चौकशी, अटक किंवा देश सोडण्यास सांगणे अशी कारवाई केली जाऊ शकते. मात्र केवळ तक्रार आल्याने लगेच गुन्हा सिद्ध होत नाही, संबंधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी लागते.