उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 25 ऑक्टोबरला राज्यभर FLNAT परीक्षा;राज्यातील सुमारे 7 लाख परीक्षार्थी सहभागी होण्याची अपेक्षा - टॉप न्यूज मराठी

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यातील असाक्षर व्यक्तींसाठी रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ७ लाख परीक्षार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

परीक्षेच्या पूर्वतयारीचा व नियोजनाचा आढावा घेण्यासाठी दि. १५ ऑक्टोबर रोजी शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (योजना) व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

परीक्षेचे स्वरूप व नियम

ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि बंगाली अशा नऊ भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. वयाची १५ वर्षे पूर्ण केलेल्या व नोंदणी केलेल्या व्यक्तींना परीक्षेला बसता येईल. परीक्षेसाठी एकूण १५० गुण असून, वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या तीन विभागांसाठी प्रत्येकी ५० गुण असतील. प्रत्यक्ष परीक्षा तीन तासांची असून, दिव्यांग परीक्षार्थ्यांना ६० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येईल.

ज्या शाळांमधून असाक्षर व्यक्तींची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे, त्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून कार्यरत राहतील. परीक्षार्थ्यांनी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा बँक पासबुक यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी शाळास्तरावर करण्यात येणार असून, मूल्यांकनाचे गुण उल्लास पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्यात येतील.

नवसाक्षरांना पुढील शिक्षणाची संधी

FLNAT परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्थेच्या (NIOS) किंवा राज्य मुक्त विद्यालयी शिक्षण संस्थेच्या (SIOS) माध्यमातून इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होता येणार आहे.

राज्यातील असाक्षर व्यक्तींनी शिक्षणासाठी नजीकच्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत नोंदणी करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच, जास्तीत जास्त नवसाक्षरांनी FLNAT परीक्षेला उपस्थित राहून साक्षरतेचे प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.