पुणे : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून दिनांक २५ सप्टेंबर, २०२६ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
23 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर, २०२६ पासून विविध १० केंद्रांवर तर ६५ व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिमफेरी प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित /करण्यात येणार आहे. नोंदणीकृत नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण भरलेल्या प्रवेशिका विहित मुदतीत प्रवेशिका ऑनलाईन सादर कराव्यात.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल. राज्यातील जास्तीत जास्त नाटय संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. खेडेकर यांनी केले आहे.