सेवा संकल्प अभियानांतर्गत बावडा येथे कर्करोग तपासणी शिबिर उत्साहात संपन्न, 244 लाभार्थ्यांची तपासणी - टॉप न्यूज मराठी

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत कर्करोग तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 244 लाभार्थ्यांची तपासणी आणि स्क्रीनिंग करण्यात आली.

कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी आणि संभाव्य रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तोंडाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग या तीन प्रमुख प्रकारांच्या तपासणीवर विशेष भर देण्यात आला होता. कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात हे लक्षात घेऊन नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

हे शिबिर पुणे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हांकारे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भाग्यश्री पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना जोशी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वसावे यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. उत्कृष्ट नियोजन आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर हा आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आला.

कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात जनजागृती, नियमित तपासणी आणि वेळेवर निदान हीच प्रभावी शस्त्रे आहेत. नागरिकांनी आरोग्यविषयक लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करून घ्यावी आणि आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. लवकर निदान, प्रभावी उपचार, निरोगी समाज हे ध्येय समोर ठेवून आरोग्य विभागामार्फत अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे.