मोठी बातमी : पुणे बंगळुरू महामार्गावर 24 तास चक्काजाम, दिवाळीला घरी निघालेले हजारो प्रवासी रस्त्यावरच अडकले, दूधाचे टँकरही थांबले - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्र : पुणे बंगळगुरू महामार्गावर गेल्या 24 तासांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता 4500 रुपये मिळावा या मागणीसाठी महामार्ग रोखून धरला आहे. कोल्हापूरच्या किनी टोलनाक्यापासून ते सातारा नागठाणेपर्यंत हे आंदोलन सुरू आहे. काल सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेले आंदोलन आज 11 वाजेपर्यंतही सुरूच आहे.

दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी निघालेले हजारो प्रवासी यात अडकून पडले आहेत. लहान मुलांसोबत, वयोवृद्धांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांचे प्रचंड हाल झाले आहेत. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही अशी अवस्था अनेक प्रवाशांची झाली आहे. अनेकांनी रस्त्यावरच रात्र काढली. काही प्रवाशांनी पर्यायी रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केला पण सर्व रस्ते जाम झाल्याने त्यांनाही परत यावे लागले.

मालवाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. दूधाचे टँकर, भाजीपाला घेऊन जाणारे ट्रक, मोठे कंटेनर 24 तासांपासून जागच्या जागी उभे आहेत. दुध खराब होण्याची भीती आहे. भाजीपाला सडण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णांचेही हाल झाले आहेत.

आंदोलनकर्त्यांची मागणी काय आहे

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 4500 रुपये पहिला हप्ता देण्यात यावा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्य मागणी आहे. जोपर्यंत सरकार ही मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे. आंदोलन किती दिवस चालेल याची गॅरेंटी देता येत नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आंदोलक रस्त्यावरून हटायला तयार नाहीत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कधी सुरू होणार हे अजून स्पष्ट नाही. प्रवाशांनी पुढील काही तास या मार्गाने प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 प्रतिनिधी : अजित सोनावणे, टॉप न्यूज मराठी