महाराष्ट्र - महाराष्ट्र राज्यात अमराठी ऑटोरिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक तसेच चालकांसाठी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत 2 ऑक्टोबर 2026 ते 23 जानेवारी 2027 या कालावधीत मराठी भाषा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये अमराठी ऑटोरिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक चालकांना चार सत्रांमध्ये मराठी भाषेचे प्राथमिक व्यवहारिक ज्ञान दिले जाणार आहे. प्रशिक्षणाची वेळ दररोज दुपारी 3 ते 4 अशी आहे.
प्रमाणपत्राशिवाय चालणार नाही, हे लक्षात ठेवा
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चालकांच्या मराठी भाषेच्या जुजबी व्यवहारिक ज्ञानाची तपासणी करून अधिकृत प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. अमराठी ऑटोरिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक चालकांसाठी हे प्रमाणपत्र परिवहन विभागाने अनिवार्य केले आहे. प्रमाणपत्र देण्याचे अधिकार केवळ कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थांना देण्यात आले असून या संस्थांनी जारी केलेले प्रमाणपत्रच वैध राहणार आहे.
प्रशिक्षणासाठी काय घेऊन जावे
प्रशिक्षणासाठी येताना चालकांनी आधारकार्ड, रिक्षा अथवा टॅक्सी चालक परवाना, वाहन परवाना आणि दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणावीत.
सर्व अमराठी ऑटोरिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक चालकांनी 23 जानेवारी 2027 पर्यंत दररोज दुपारी 3 ते 4 या वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगम ब्रिजजवळ, पुणे येथील सहकार सभागृह पहिला मजला येथे उपस्थित राहून मराठी भाषेचे प्राथमिक व्यवहारिक ज्ञान प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.