इन्कलाबच्या एका किंकाळीने ब्रिटिश साम्राज्य हादरवणारा 23 वर्षांचा युवक- शहीद-ए-आजम भगतसिंग; भगतसिंग यांच्या जयंती निमित्त विशेष लेख - टॉप न्यूज मराठी

आजपासून ११८ वर्षांपूर्वी एक मूल जन्माला आलं, ज्याने आयुष्य फक्त २३ वर्षांचं जगलं, पण त्या २३ वर्षांनी पुढच्या शंभर पिढ्यांना जगण्याची हिंमत दिली. त्याचं नाव भगतसिंग.

जन्म आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

२८ सप्टेंबर १९०७. ठिकाण - लायलपूर जिल्ह्यातील बंगा गाव, जे आज पाकिस्तानात आहे. भगतसिंग यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला नाही, तर एका क्रांतीच्या विचारांनी भारलेल्या कुटुंबात झाला. वडील सरदार किशनसिंग संधू आणि आई विद्यावती कौर. काका अजितसिंग आणि स्वर्णसिंग हे दोघेही ब्रिटिशांविरोधात लढणारे जहाल क्रांतिकारक होते. घरात स्वातंत्र्याच्या गोष्टी, तुरुंगवासाच्या कहाण्या आणि फाशीच्या चर्चा रोजच्या होत्या. त्यामुळे देशभक्ती भगतसिंग यांना शिकवावी लागली नाही, ती त्यांच्या रक्तातच होती.

लहानपणीच्या एका गोष्टीने त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवली. वयाच्या १२ व्या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड झालं. शेकडो निरपराध भारतीयांना ब्रिटिशांनी गोळ्या घालून मारलं. ही बातमी ऐकून लहान भगतसिंग त्या बागेत गेले आणि तिथली रक्ताने माखलेली माती एका बाटलीत भरून घरी आणली. ती माती त्यांनी देव्हाऱ्यात ठेवली होती. त्या दिवसापासून त्यांनी मनाशी ठरवलं - आता शिकायचं नाही तर देशासाठी जगायचं आणि मरायचं.

शिक्षण - पुस्तकापेक्षा विचार मोठे

भगतसिंग यांचे प्राथमिक शिक्षण बंगा गावात आणि नंतर लाहोरच्या दयानंद अँग्लो वैदिक हायस्कूलमध्ये झाले. पुढे ते लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या नॅशनल कॉलेज, लाहोर मध्ये दाखल झाले. हे कॉलेज म्हणजे स्वातंत्र्याचा अड्डा होता. इथे इतिहास, राजकारण, समाजवाद यावर चर्चा व्हायची.

भगतसिंग फक्त शाळेतल्या पुस्तकांत अडकले नाहीत. ते कार्ल मार्क्स, लेनिन, बाकुनिन यांचे साहित्य वाचायचे. त्यांना समजले होते की फक्त ब्रिटिशांना हाकलून स्वातंत्र्य मिळणार नाही, तर गरीब, शेतकरी, कामगार यांच्या शोषणाविरुद्ध पण लढावे लागेल. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी लग्नासाठी नकार दिला आणि लिहून ठेवलं, माझं लग्न तर मृत्यूशीच होणार आहे आणि माझी वधू स्वातंत्र्य असेल.

देशासाठी कार्य - नुसत्या घोषणा नाहीत तर कृती

१९२६ मध्ये त्यांनी नौजवान भारत सभेची स्थापना केली. तरुणांना जागृत करणं हा उद्देश होता. पुढे चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल यांच्यासोबत हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन आणि नंतर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन स्थापन केली.

त्यांच्या आयुष्यात दोन घटना गाजल्या. पहिली - १९२८ मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शन करत असताना लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिशांनी लाठीहल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. भगतसिंग यांनी या अपमानाचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. १७ डिसेंबर १९२८ रोजी त्यांनी जॉन सॉन्डर्स या ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले.

दुसरी घटना - ८ एप्रिल १९२९. इंग्रजांनी कामगारविरोधी कायदे आणले होते. त्याचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला. लक्षात घ्या, बॉम्ब कुणाला मारण्यासाठी नव्हता, तो बहिऱ्या इंग्रज सरकारला जागं करण्यासाठी होता. बॉम्ब फेकल्यानंतर ते पळाले नाहीत. तिथेच उभे राहून इन्कलाब झिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि स्वतःहून अटक करून घेतली.

बलिदान - मृत्यूला हसतमुखाने कवटाळलं

तुरुंगातही त्यांचा लढा सुरूच होता. राजकीय कैद्यांना चांगली वागणूक मिळावी म्हणून त्यांनी ११६ दिवस उपोषण केलं. लाहोर कटाच्या खटल्यात त्यांना, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

२३ मार्च १९३१. लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात. तिघेही हसत हसत फासावर गेले. वय काय होतं? फक्त २३ वर्षे. ज्या वयात आजची पिढी करिअरचा विचार करते, त्या वयात त्याने देशासाठी प्राण दिले. इंग्रज इतके घाबरले होते की त्यांनी रात्रीच्या अंधारात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आणि रक्षा सतलज नदीत वाहून दिली.

भगतसिंग गेले, पण ते विचार देऊन गेले. त्यांनी लिहिलेलं - मी नास्तिक का आहे ? हे पुस्तक आजही तरुणांना विचार करायला लावतं. भगतसिंग यांची जयंती म्हणजे फक्त हार घालून फोटोला नमस्कार करण्याचा दिवस नाही. तो दिवस आहे स्वतःला विचारण्याचा, मी माझ्या देशासाठी आज काय केलं?