23 वर्षे. फक्त 23 वर्षे जगला तो. पण या 23 वर्षांत त्याने 200 वर्षांच्या गुलामीला लाजवेल असा इतिहास लिहिला. आज 15 ऑगस्टला जेव्हा आपण तिरंगा फडकवतो, तेव्हा भगतसिंग सारख्या शहीदांशिवाय तो तिरंगा अपूर्ण आहे.
28 सप्टेंबर 1907 ला पंजाबच्या बंगा गावात भगतसिंगचा जन्म झाला. त्यांचा परिवार आधीपासूनच स्वातंत्र्य चळवळीत होता. काका अजितसिंग आणि वडील सरदार किशनसिंग हे देखील क्रांतिकारी होते. लहानपणी शेतात खेळण्याऐवजी तो बंदूक लावायचा. लोक विचारायचे "काय करतोय?" तर म्हणायचा "इंग्रजांना मारण्यासाठी बंदुका पेरतोय". वयाच्या 12 व्या वर्षी जालियनवाला बागेची माती आणून ती पूजायचा. तिथेच त्याच्या मनात पहिली आग पेटली.
लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये शिकत असताना 1921 मध्ये असहकार आंदोलन सुरू झाले. गांधीजींनी शाळा-कॉलेज सोडायला सांगितले. भगतसिंग पहिल्या रांगेत होते. त्यांनी डिग्री सोडली, पण क्रांतीची पदवी घेतली. याच काळात ते "नौजवान भारत सभा" आणि नंतर "हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन" मध्ये सामील झाले. चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव त्यांचे सवंगडी झाले. त्यांचे ध्येय एकच होते - "इन्कलाब जिंदाबाद" आणि "संपूर्ण स्वातंत्र्य".
1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात लाला लजपतराय यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी शपथ घेतली - "बदला घ्यायचाच". चुकून ब्रिटीश अधिकारी जे.पी. सॉन्डर्स मारला गेला. फरार झाले, पण थांबले नाहीत.
1930 मध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीत बाँब फेकला. उद्देश कोणाला मारणे नव्हता. उद्देश होता - "बहिरे झालेल्या सरकारला ऐकवणे". बाँब फेकल्यावर ते पळाले नाहीत. घोषणाबाजी करत अटक करून घेतली. कोर्टात त्यांनी 4 तास भाषण केले. ते म्हणाले, "बाँबचा आवाज नसून माझे विचार ऐकले पाहिजेत."
तुरुंगात असताना त्यांनी 116 दिवस उपोषण केले. राजकीय कैद्यांना चांगली वागणूक मिळावी यासाठी. तिथे त्यांनी "मी नास्तिक का आहे" हा लेख लिहिला. वयाच्या 23 व्या वर्षीही त्यांचे विचार एखाद्या तत्ववेत्त्यासारखे होते. ब्रिटिश सरकार घाबरले होते. कारण भगतसिंग जिवंत असेपर्यंत तरुण झोपणार नव्हते.
ठराविक वेळ 24 मार्च सकाळी होती. पण सरकार घाबरले आणि एक दिवस आधीच, 23 मार्च 1931 च्या संध्याकाळी 7:33 वाजता लाहोरच्या तुरुंगात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. फाशीच्या आधी ते लेनिनचे पुस्तक वाचत होते. शेवटचा शब्द होता - "इन्कलाब जिंदाबाद". त्यांचे मृतदेह नातेवाईकांना न देता गुप्तपणे सतलज नदीच्या काठावर जाळण्यात आले. पण सरकारला काय माहित, राखेतूनही क्रांती जन्म घेते.
भगतसिंग फक्त क्रांतिकारी नव्हते. ते वाचक होते, विचारवंत होते, समाजवादी होते. त्यांना खरा स्वातंत्र्य म्हणजे फक्त ब्रिटिशांना हाकलणे नव्हे, तर गरीब-श्रीमंत, जात-धर्म यातील भेद मिटवणे असे वाटायचे.
आज जेव्हा आपण "विकसित भारत" बद्दल बोलतो, तेव्हा भगतसिंग आपल्याला विचारतात - "तुम्ही कोणत्या भारताचे स्वप्न पाहताय? फक्त श्रीमंतांचा भारत की शेतकरी, मजूर, महिला सगळ्यांचा भारत?"
23 वर्षांचा एक तरुण फाशीवर जाऊ शकतो देशासाठी, तर आपण 23 मिनिटे तरी देशासाठी देऊ शकतो का? हाच खरा आदरांजली असेल.
आज स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भाषण होईल. पण खऱ्या अर्थाने देशभक्ती म्हणजे काय हे भगतसिंग यांनी 23 वर्षांत जगून दाखवले.
"ते तुम्हाला मारू शकतात, पण तुमच्या विचारांना नाही" - शहीद-ए-आजम भगतसिंग
जय हिंद!