'छात्रों की गुंज'! पुण्यात 22 ऑगस्टला राहुल गांधी साधणार महिला विद्यार्थिनींशी संवाद ; रामचंद्र कदम यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांची भव्य बैठक - टॉप न्यूज मराठी

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात येत्या रविवार, 22 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यात 'छात्रों की गुंज' हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी ठामपणे उभे राहण्यासाठी या कार्यक्रमातून पुण्यात नव्या परिवर्तनाची हाक दिली जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस गटनेते तथा नगरसेवक ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी शनिवारी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सपकाळ यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "मोदी सरकारच्या राजवटीत महागाई आणि बेरोजगारीमुळे सामान्य जनता आणि युवा वर्ग हवालदिल झाला आहे. सीईटी सारख्या परीक्षांचे पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाणी फिरवले जात आहे. पेपरफोडीचे केंद्र पुणे असून अटक झालेले प्राध्यापक भाजपशी संबंधित संस्थांशी जोडले आहेत."

दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचे 50 दिवसांचे शांततापूर्ण आंदोलन लाठीमार आणि अश्रुधुराने चिरडले गेले, असेही त्यांनी सांगितले. "आता या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे," असे ते म्हणाले.

राहुल गांधी 22 ऑगस्टला पुण्यात प्रथमच महिला विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. "या 'छात्रों की गुंज' कार्यक्रमाला सावित्रीच्या लेकींनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे," असे आवाहन सपकाळ यांनी केले.

बैठकीला मोहन जोशी, प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी, अरविंद शिंदे, जयाशेठ किराड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.