पुण्यात मोठी कारवाई ! 21 किलो 180 ग्रॅम गांजासह 11.44 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक - टॉप न्यूज मराठी

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. युनिट ०६ गुन्हे शाखा, पुणे शहर पोलिसांनी वानवडी परिसरात मोठी कारवाई करत तब्बल २१ किलो १८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ११ लाख ४४ हजार २९० रुपये इतकी आहे.

वरिष्ठांच्या आदेशाने दिनांक 30/08/2026 रोजी युनिट-६ कडील सहा. पोलीस निरीक्षक संतोष कदम, पोलीस उप-निरीक्षक आशिष जाधव, सपोफौ ज्ञानेश्वर शिर्के व स्टाफ पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी महिला पोलीस हवालदार पल्लवी मोरे व पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम मोपेड गाडीवरती नविन म्हाडा कॉलनी येथे थांबलेला असून त्याच्या गाडीवरती गांजा आहे.

मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून त्या इसमाला ताब्यात घेतले. त्याला माल पुरवणारा इसम नामे पोपट मारुती पाडुळे, वय ५६ वर्षे, रा. नविन म्हाडा कॉलनी बिल्डिंग नं. ११, रूम नं. १०२ येथून ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. आरोपी नामे पोपट मारुती पाडुळे, वय ५६ वर्षे, रा. बिल्डिंग नं. ११, रूम नं. १०२, नविन म्हाडा कॉलनी, सुखसागर, पुणे याचेकडून २१ किलो १८० ग्रॅम गांजा व इतर मुद्देमाल असा एकूण ११,४४,२९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी वानवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ४९१/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क),२०(ब)(ii)(क),२९ अन्वये गुन्हा दाखल असून कायदेेशीर कारवाई करण्यात येत असून, गांजाचा पुरवठा करणारे तसेच या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. गौहर हसन, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे- २ श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आली आहे.