पीएम किसान सन्मान निधी योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे एकदाच न देता तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये थेट बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा होतात.
21 वा हप्ता कधी जमा होणार -
20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. नियमानुसार दर चार महिन्यांनी हप्ता येतो. त्यानुसार 21 वा हप्ता नोव्हेंबर 2026 मध्ये येणे अपेक्षित आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान किंवा 19 नोव्हेंबर रोजी हा हप्ता जमा करू शकते. पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर 19 नोव्हेंबर ही तारीख सांगण्यात आली आहे. अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. परंतु सरकारची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्त 8 लाख 55 हजार शेतकऱ्यांना हा 21 वा हप्ता अगोदरच देण्यात आला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 7 ऑक्टोबरला 171 कोटी रुपये तेथील शेतकऱ्यांना दिले आहेत. आता उर्वरित देशातील शेतकऱ्यांचा नंबर आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत -
सरकारने यावेळी तीन गोष्टी बंधनकारक केल्या आहेत. जर या तीन गोष्टी केल्या नसतील तर तुमचा हप्ता अडकेल.
1) ई केवायसी पूर्ण असणे बंधनकारक आहे.
2) आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे आणि डीबीटी ऑप्शन चालू असणे आवश्यक आहे.
3) लँड सीडिंग म्हणजेच जमिनीची पडताळणी झालेली असावी.
यापैकी एकही गोष्ट अपूर्ण असेल तर 2000 रुपये खात्यात येणार नाहीत.
यादीत तुमचे नाव आहे का असे तपासा -
तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का हे घरबसल्या मोबाईलवर तपासता येते.
स्टेप 1 - सर्वात आधी http://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
स्टेप 2 - होम पेजवर Farmer Corner मध्ये जा.
स्टेप 3 - तिथे Beneficiary List या ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप 4 - तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडा.
स्टेप 5 - Get Report वर क्लिक करा. तुमच्या गावाची संपूर्ण यादी येईल. त्यात तुमचे नाव शोधा.
तुमचा स्टेटस कसा चेक करायचा -
Beneficiary Status चेक करण्यासाठी Know Your Status वर क्लिक करा. तिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर टाका. तिथे तुम्हाला ई केवायसी, लँड सीडिंग आणि हप्त्याचा स्टेटस दिसेल.
ई केवायसी कशी करायची -
ई केवायसी करणे खूप सोपे आहे. http://pmkisan.gov.in वर जाऊन OTP Based e-KYC ऑप्शनवर क्लिक करा. आधार नंबर टाका. आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल तो टाका. दुसरा OTP पण टाका आणि सबमिट करा. तुमची ई केवायसी पूर्ण होईल. जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळच्या CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक द्वारे ई केवायसी करता येते.
कोण पात्र नाही - संस्थात्मक जमीन धारक, माजी किंवा विद्यमान मंत्री, खासदार, आमदार, महापौर, 10000 पेक्षा जास्त पेन्शन घेणारे निवृत्त कर्मचारी, मागच्या वर्षी इन्कम टॅक्स भरलेले लोक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हप्ता येण्यापूर्वीच तुमची सर्व कागदपत्रे पूर्ण करून घ्या.