पुणे : पावसाचे पाणी अडवणे, ते जमिनीत मुरवणे, मातीचे संवर्धन करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे जिल्ह्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’ तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध जनजागृती, शैक्षणिक आणि प्रत्यक्ष जलसंधारणाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
२१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिना’निमित्त ‘महा वॉकेथॉन–जलासाठी चालूया’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘माती वाचवा, पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा’ हा या उपक्रमाचा मुख्य संदेश असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या संकल्पनेतून नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जागृती करण्यात येणार आहे.
माती आणि पाण्याचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या उपक्रमात पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
युवक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, उद्योजक तसेच जलसंधारण क्षेत्रात कार्यरत विविध घटकांनी या उपक्रमात सहभागी होऊन ‘पाणी वाचवा, भविष्यासाठी पाणी जपा’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पदयात्रेत सहभागी नागरिकांना जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे. जलसंधारण हा केवळ शासनाचा उपक्रम न राहता त्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम
जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, भित्तीचित्र, वादविवाद आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘एक शाळा–एक शोषखड्डा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देतानाच त्यांचा ‘जलमित्र’ आणि ‘जलदूत’ म्हणून सहभाग वाढविण्यात येणार आहे.
युवकांसाठी जलसंधारणावरील लघुचित्रफीत स्पर्धा
जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत आधुनिक माध्यमातून पोहोचविण्यासाठी ‘माती व पाणी संवर्धनावरील लघुचित्रफीत’ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. माती संवर्धन, पाणी बचत, पावसाचे पाणी साठवण, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण तसेच जलसंधारणाच्या यशस्वी कामांवर आधारित सर्जनशील लघुचित्रफीत तयार करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष जलसंधारणाच्या कामांनाही चालना
या कालावधीत जलसंधारणाच्या कामांचे भूमिपूजन, लोकार्पण व जलपूजन, अमृत सरोवरांना भेट, वृक्षारोपण, जलस्रोतांची स्वच्छता तसेच शेततळे, शेतबंधारे, सलग समतल चर आणि खोल सलग समतल चर आदी कामांची पाहणी करण्यात येणार आहे. विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
“जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी जलसुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन–जलासाठी चालूया’ या उपक्रमात जास्तीत जास्त पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,” असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.