हिंदू धर्मामध्ये पतीच्या उदंड आयुष्यासाठी पूजले जाणारे सण आहेत महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वटसावित्रीची पूजा केली जाते तशीच करवा चौथ देखील भारतामध्ये साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या उदंड निरोगी आयुष्यासाठी निर्जळी म्हणजेच पाणी देखील न पिता सकाळपासून ते रात्री चंद्र उदयापर्यंत व्रत पाळतात रात्री चंद्र उदय झाल्यानंतर पतीचे आशीर्वाद घेऊन व तिच्याच हातून पाणी पिऊन हा उपवास सोडला जातो अशी मान्यता आहे. उद्या म्हणजेच गुरुवार 29 ऑक्टोबर 2026 रोजी देशभरात करवा चौथचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. विवाहित महिलांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी निर्जला उपवास करतात. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला हा सण येतो.
करवा चौथची तिथी आणि शुभ मुहूर्त -
पंचांगानुसार यावर्षी चतुर्थी तिथी 29 ऑक्टोबर रोजी पहाटे 1 वाजून 6 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्री 10 वाजून 9 मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे उपवास उद्याच केला जाणार आहे.
पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 38 मिनिटांपासून ते 6 वाजून 56 मिनिटांपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते. उपवास सकाळी सूर्योदयापासून सुरू होईल.
पुणे आणि महाराष्ट्रात चंद्रोदय वेळ
करवा चौथला चंद्राची पूजा करूनच उपवास सोडला जातो. दिल्लीत चंद्र 8 वाजून 17 मिनिटांनी निघेल, तर पुण्यात आणि मुंबईत चंद्र उशिरा निघतो. पुण्यात अपेक्षित चंद्रोदय रात्री 8 वाजून 58 मिनिटांनी आहे आणि मुंबईत रात्री 9 वाजता आहे. त्यामुळे पुण्यातील महिलांनी 9 वाजेनंतर चंद्राची पूजा करावी.
पूजेसाठी लागणारे साहित्य -
पूजेसाठी दोन मातीचे करवे म्हणजेच छोटे मटके, एक तांब्याचा लोटा, चाळणी, दिवा, अगरबत्ती, कुंकू, हळद, अक्षता, फुले, मिठाई, आणि पतीचा फोटो किंवा प्रतिमा लागते. तसेच वायन देण्यासाठी सवाष्ण महिलेसाठी साडी, बांगड्या आणि दागिने देखील लागतात. पूजेच्या ताटात हे सर्व साहित्य तयार ठेवावे.
पूजा विधी कशी करावी -
सकाळी लवकर उठून सर्गी खावी. सर्गी म्हणजे सासूने सुनेला दिलेले अन्न. त्यानंतर दिवसभर निर्जला उपवास करावा, म्हणजे पाणी देखील प्यायचे नाही. संध्याकाळी मुहूर्तावर सर्व महिलांनी एकत्र येऊन पूजा करावी. एका ठिकाणी माता पार्वती, भगवान शिव आणि गणेश यांची प्रतिमा ठेवावी. करव्यामध्ये पाणी भरून त्याची पूजा करावी. त्यानंतर करवा चौथची व्रत कथा ऐकावी. कथा ऐकल्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही.
चंद्राला अर्घ्य कसे द्यावे -
रात्री चंद्र निघाल्यावर चाळणीतून प्रथम चंद्राला पहावे, नंतर त्याच चाळणीतून आपल्या पतीला पहावे. त्यानंतर तांब्याच्या लोट्याने चंद्राला पाणी म्हणजेच अर्घ्य द्यावे. पतीच्या हातून पाणी पिऊन उपवास सोडावा. त्यानंतर पतीने पत्नीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे.
करवा चौथ व्रत कथा -
कथेनुसार एका सावकाराला सात मुले आणि एक मुलगी होती. तिचे नाव वीरावती होते. लग्नानंतर पहिल्याच करवा चौथला ती माहेरी आली. तिने उपवास केला पण भुकेने तिची अवस्था वाईट झाली. तिच्या भावांना हे पाहवले नाही, त्यांनी झाडावर आरसा लावून तिला खोटा चंद्र दाखवला. तिने खोटा चंद्र पाहून उपवास सोडला. त्यामुळे तिचा पती आजारी पडला. नंतर तिने माता पार्वतीची क्षमा मागून 12 महिने प्रत्येक चतुर्थीला उपवास केला, तेव्हा तिचा पती बरा झाला. म्हणून या व्रतात चंद्र पाहिल्याशिवाय उपवास सोडू नये अशी मान्यता आहे.