मुंबई : यंदा श्री गणरायाचे आगमन 14 सप्टेंबर रोजी होत आहे. सणाच्या उत्साहाबरोबरच मुंबई, ठाणे, पालघरमधील लाखो चाकरमानी गावी जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटीने मोठी तयारी केली आहे. नफा-तोट्याचा विचार न करता केवळ प्रवासी सेवेसाठी एसटी यंदा विक्रमी जादा बसेस सोडणार आहे.
7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या 19 दिवसांच्या कालावधीत एकूण 5,220 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसेस मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांतून कोकणातील विविध मार्गांवर धावणार आहेत.
मित्र-मैत्रिणी किंवा गावातील मंडळी एकत्र जात असतील तर त्यांच्यासाठी खास सुविधा आहे.
- 10 ऑगस्ट 2025 पासून
- किमान 40 प्रवाशांचा गट
- गट आरक्षणात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत मिळेल. तसेच 75 वर्षांवरील 'अमृत ज्येष्ठ नागरिकांना' प्रवास पूर्णपणे मोफत असेल.
गणेशोत्सव काळात प्रवास सुरळीत व्हावा यासाठी एसटीने खालील नियोजन केले आहे:
- मुंबईतील सर्व प्रमुख बसस्थानके आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र काम करतील.
- कोकणातील प्रमुख महामार्गांवर ठिकठिकाणी वाहनदुरुस्तीची पथके तैनात करण्यात येणार आहेत.
- प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड सेवा देणे.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई सेंट्रल येथील आढावा बैठकीत ही माहिती दिली. ते म्हणाले, "गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा सण आहे. गणपती बाप्पा, मुंबईतील कोकणवासी आणि एसटीचे अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही मोठ्या प्रमाणावर सेवा देण्यास तयार आहोत.आषाढी एकादशीसाठी एसटीने 5,200 जादा बसेस सोडल्या होत्या आणि त्याला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर यंदा गणेशोत्सवासाठी आणखी जास्त, म्हणजे 5,220 बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा गणपतीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीचा हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. आरक्षणासाठी 10 ऑगस्टपासून एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि बसस्थानकांवर संपर्क साधता येईल."