रोजगार महाकुंभ महाराष्ट्र 2026 : पुणे जिल्ह्यात 30 ठिकाणी रोजगार मेळावे; 29 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी रोजगार मेळावे व 'प्लेसमेंट ड्राइव्हचे' आयोजन - टॉप न्यूज मराठी

पुणे : युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरात २९ सप्टेंबर २०२६ रोजी एकाच दिवशी ५०० हून अधिक रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने विविध तालुक्यांतील ३० शैक्षणिक संस्थांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी

देशातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमातून युवकांना त्यांच्या जिल्ह्यात अथवा परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर उद्योग व विविध आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि शासन, उद्योग-आस्थापना तसेच रोजगार इच्छुक युवक-युवती यांना एकाच व्यासपीठावर आणणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

विविध आस्थापनांचा सहभाग

पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांमध्ये विविध नामांकित उद्योग, कंपन्या व आस्थापनांचा सहभाग राहणार आहे. या आस्थापनांकडून विविध शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि रोजगाराच्या स्वरूपानुसार रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

रोजगार इच्छुक युवक-युवतींनी सहभागी व्हावे

पुणे जिल्ह्यातील रोजगार इच्छुक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या कौशल्याला व पात्रतेला अनुरूप रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

राज्यातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासोबतच उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’ हा त्याचाच एक भाग असून, युवक आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक प्रभावी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे-११ येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ असून, रोजगारविषयक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.