गणेश उत्सव 2026 : 134 वर्षांची परंपरा ! यंदा वृंदावनच्या प्रेम मंदिरात विराजमान होणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा - टॉप न्यूज मराठी

गणेश उत्सव 2026 : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यात गणेशउत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. मानाच्या पाच गणपती आणि दगडूशेठ गणपती बाप्पाच्या आगमन आणि देखाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट प्रेममंदिराचा देखावा सादर करणार आहे. 

1 . इतिहास - दुःखातून जन्मलेला नवसाचा गणपती

दगडूशेठ गणपतीचा इतिहास १८९३ पासूनचा आहे. पुण्यातील प्रसिद्ध हलवाई श्रीमंत दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई यांनी प्लेगच्या साथीत आपला मुलगा गमावला. त्यांच्या गुरू माधवनाथ महाराजांनी त्यांना दत्ताची संगमरवरी आणि गणपतीची मातीची मूर्ती पूजण्यास सांगितले आणि सांगितले हीच दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील.

या पहिल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली, ती मूर्ती आजही शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात आहे. १८९६ साली दुसरी मूर्ती आली आणि सार्वजनिक उत्सव सुरू झाला. त्यानंतर १९६८ मध्ये कर्नाटकचे शिल्पकार शंकरअप्पा शिल्पी यांनी आताची तिसरी, तेजस्वी मूर्ती घडवली, जिच्या पोटात सिद्ध गणेश यंत्र आहे.

2. परंपरा काय सांगते ?

१९५२ नंतर सुवर्णयुग तरुण मंडळाने या उत्सवाची जबाबदारी घेतली. इथे फक्त उत्सव नाही, तर दरवर्षी वेगळ्या ऐतिहासिक वास्तूची प्रतिकृती बनवण्याची परंपरा आहे. मागच्या वर्षी मैसूर पॅलेस, तुळशीबागेने वृंदावन थीम केली होती. याच पैशातून ट्रस्ट बँक, वृद्धाश्रम, हॉस्पिटल चालवते.

3. 2026 चा देखावा - वृंदावनचे प्रेम मंदिर

यंदा ट्रस्ट १३४ वा गणेशोत्सव साजरा करत आहे आणि यंदाची थीम अधिकृतपणे जाहीर झाली आहे - वृंदावनचे प्रेम मंदिर . यंदा वृंदावनच्या प्रेम मंदिरात विराजमान होणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा

देखावा कसा असेल?

  • आकार: ही प्रतिकृती १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० ते १०८ फूट उंच असेल. ही आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सजावटींपैकी एक आहे.
  • डिझाईन: पांढऱ्या संगमरवरी लूकचे भव्य खांब, घुमट, कोरीव कमानी. मुख्य प्रवेशद्वारावर बुधवार चौकात एक सुंदर कमान असेल.
  • आत काय असेल: आत रासलीला, गोवर्धन लीला, झुला उत्सव अशा कृष्णाच्या जीवनातील प्रसंग शिल्पांमधून दाखवले जातील. मुख्य दर्शनी भागावर राधा-कृष्णाची भव्य मूर्ती असेल. दोन्ही बाजूला रनिंग मंडप असतील जिथे कृष्णलीला दाखवली जाईल. रात्री फुलांची आरास आणि आधुनिक लाईटिंगमुळे मंदिर उजळून निघेल. 

४. प्रेम मंदिर कुठे आहे? महत्त्व काय?

प्रेम मंदिर हे उत्तर प्रदेशातील वृंदावन, मथुरा येथे आहे. याला 'Temple of Love' म्हणतात.

  • इतिहास: पाचवे जगद्गुरू श्री कृपालू महाराज यांनी १४ जानेवारी २००१ रोजी पायाभरणी केली आणि १२ वर्षे १००० कारागिरांनी काम करून १७ फेब्रुवारी २०१२ रोजी मंदिराचे उद्घाटन झाले. खर्च आला सुमारे १५० कोटी रुपये.
  • वास्तुकला: हे संपूर्ण मंदिर इटालियन पांढऱ्या संगमरवरापासून बनले आहे. ५४ एकर परिसरात पसरले आहे. हे नागर शैलीचे, राजस्थानी-गुजराती पद्धतीचे मंदिर आहे. यात दोन मजले आहेत - खाली राधा-कृष्ण आणि वर सीता-राम.
  • महत्त्व: इथे भिंतींवर कृष्णाच्या चार प्रमुख लीला - झुला लीला, गोवर्धन लीला, रास लीला आणि कालिया नाग लीला कोरलेल्या आहेत. संध्याकाळी लाईट आणि म्युझिकल फाउंटन शो हे मुख्य आकर्षण आहे. प्रेम, भक्ती, आणि सामाजिक सलोख्याचा संदेश हे मंदिर देते. म्हणूनच दगडूशेठ ट्रस्टने यंदा 'जिथे भक्ती प्रेम बनते आणि प्रेम देवत्व बनते' ही संकल्पना निवडली आहे. 

यंदा गणपती बाप्पा प्रत्यक्ष प्रेम मंदिरात विराजमान झाल्यासारखा अनुभव पुणेकरांना येणार आहे.