विद्यापीठाच्या ‘जल्लोष 2026’ स्पर्धेत 1200 विद्यार्थ्यांचा सहभाग ; संधी मिळाली की प्रतिभेचा जल्लोष : गोयल - टॉप न्यूज मराठी

पुणे : ‘विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळाले, तर त्यांच्या प्रतिभेला नवी दिशा मिळते. त्यांच्या प्रतिभेचा खऱ्या अर्थाने जल्लोष होतो,’ असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित ‘जल्लोष २०२६’ या उपक्रमाच्या पिंपरी-चिंचवड विभागीय स्पर्धांच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विविध महाविद्यालयांतील सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. संगीता जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गणेश भामे, विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालिका डॉ. सविता कुलकर्णी, खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड, सदस्य ॲड. अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थी, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोयल म्हणाले, ‘महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने वाव मिळतो. त्यात ‘जल्लोष’सारख्या स्पर्धा त्यांच्यातील ऊर्जा अधिक चैतन्यदायी करण्याचे काम करतात. यातील सर्वच विद्यार्थ्यांना भविष्यात याच क्षेत्रात संधी मिळेल असे नाही. मात्र, यामुळे जगासोबत कसे वागायचे याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल, याची खात्री आहे.’       

टी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक प्रा. स्वामीराज भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.