आषाढी वारी 2026 : मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू - टॉप न्यूज मराठी

पुणे : मुख्यमंत्री वारकरी  महामंडळामार्फत गेल्या दोन वर्षापासून मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना देण्यात येणारे अनुदान यावर्षीही निरंतर सुरू ठेवण्यात आले असून विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यांच्या देखरेखीखाली या निधीचे थेट बँक खात्यात वाटप सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या "मुख्यमंत्री वारकरी महामंडळ" मार्फत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी वारी सन 2026 करीता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना दिलासा देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 2 जुलै 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार यावर्षी वारीकरीता येणाऱ्या दिंड्यांना प्रत्येकी रु. 20 हजार प्रमाणे एकूण रु. 2 कोटी 80 लाख रुपये  इतके वित्तीय अनुदान वितरित करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची आणि भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. या वारीमध्ये प्रामुख्याने कष्टकरी, शेतकरी आणि कामगार बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. वारकरी बांधवांना सुयोग्य सोयी-सुविधा पुरवणे तसेच वारीचे सूक्ष्म व नेटके नियोजन करणे या हेतूने शासनाने  दिंड्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे.

चालू वर्षामध्ये एकूण 1 हजार 400 दिंड्यांना हे अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट असून, प्राप्त अधिकृत माहितीनुसार सद्यस्थितीत एकूण 1 हजार 199 पात्र दिंड्यांपैकी 1 हजार दिंड्यांचे बँक तपशील प्राप्त झाले असून त्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. उर्वरित 199 दिंड्यांच्या बँक खात्यांचे तपशील प्राप्त होताच तात्काळ निधी वर्ग करण्यात येईल. तसेच वारीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 41 नवीन दिंड्यांच्या बाबतीतही आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहे.

 

ज्या दिंड्यांचे बँक तपशील अद्याप प्राप्त झालेले नाहीत, अशा दिंडी प्रमुखांनी आपले बँक खाते आणि आवश्यक तपशील संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे किंवा विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे त्वरित सादर करावेत, जेणेकरून अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात विनाविलंब जमा करता येईल,असे आवाहन मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केले आहे.