रब्बी हंगाम 2026 : रब्बी हंगामासाठी अनुदानित हरभरा बियाणे मिळणार, महाडीबीटीवर अर्ज सुरू - टॉप न्यूज मराठी

पुणे : केंद्र सरकारच्या आत्मनिर्भरता अभियान 2026-27 अंतर्गत रब्बी हंगाम 2026 साठी प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर हरभऱ्याचे बियाणे मिळणार असून, इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्याला 421.67 क्विंटल बियाण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये दोन प्रकारच्या बियाण्यांचा समावेश आहे.

पहिला प्रकार म्हणजे पाच वर्षांच्या आतील नवीन वाणाचे प्रमाणित बियाणे. यासाठी बियाण्याच्या किमतीच्या 75 टक्के किंवा प्रति क्विंटल 6 हजार रुपये, यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळणार आहे.

दुसरा प्रकार म्हणजे पाच वर्षांपेक्षा जास्त पण दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीतील बियाणे. यासाठी 50 टक्के किंवा प्रति क्विंटल 4 हजार रुपये अनुदान मिळेल.

याशिवाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गतही हरभरा आणि ज्वारीसाठी बियाणे वाटप होणार आहे. यासाठी दहा वर्षांपर्यंतच्या बियाण्यांसाठी 2690 क्विंटल आणि दहा वर्षांवरील बियाण्यांसाठी 1900 क्विंटल लक्ष्यांक ठेवण्यात आला आहे. यामध्ये प्रति क्विंटल 3000 रुपये आणि 1500 रुपये असे अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेचा लाभ एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त एक हेक्टरपर्यंत घेता येणार आहे. बियाण्यांचा पुरवठा महाबीजच्या वितरकांमार्फत केला जाणार आहे.

अनुदानित बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.