कृषी : पशुधन विमा योजना 2026, पशुधन विमा पोर्टल लाँच, अर्ज कसा करावा, कोण पात्र, किती पैसे मिळणार संपूर्ण माहिती - टॉप न्यूज मराठी

कृषी : केंद्र सरकारने पशुपालकांसाठी एक मोठी सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी नवी दिल्ली येथे पशुधन विमा पोर्टल म्हणजेच Pashudhan Bima Portal लाँच केले आहे. यापूर्वी जनावरांचा विमा काढणे खूप किचकट होते, आता सगळे काम एकाच पोर्टलवर ऑनलाईन होणार आहे.

ही योजना काय आहे?

पशुधन विमा योजना ही केंद्राच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाची योजना आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी यांचा विमा काढला जातो. जर जनावराचा आजारपणामुळे किंवा अपघातामुळे मृत्यू झाला तर शेतकऱ्याला विम्याची रक्कम मिळते. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान टळते. सरकारचा उद्देश ही सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि तंत्रज्ञानावर आधारित करणे हा आहे.

या पोर्टलवर काय काय होणार?

हे पोर्टल एक सिंगल डिजिटल प्लॅटफॉर्म असेल. यावर चार मुख्य कामे होतील.

  • विमा पॉलिसी काढणे
  • विम्याचा दावा करणे
  • दाव्याची स्थिती पाहणे
  • सरकारला संपूर्ण योजनेवर लक्ष ठेवता येणार

म्हणजे आता तुम्हाला विमा कंपनीच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. मोबाईलवरूनच सगळे होणार.

कोण पात्र आहे ?

या योजनेसाठी भारतातील कोणताही पशुपालक, शेतकरी, दूध उत्पादक संस्था पात्र आहे. तुमच्याकडे एक किंवा जास्त दुभती जनावरे असणे आवश्यक आहे. गायी आणि म्हशीसाठी वयोमर्यादा साधारणपणे 2 ते 10 वर्षे आहे. जनावर निरोगी असावे आणि त्याचे टॅगिंग झालेले असावे.

किती फायदा मिळणार आणि प्रीमियम किती ?

या योजनेत जनावराच्या बाजारभावानुसार विमा रक्कम ठरते. साधारणपणे एका जनावरासाठी 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत विमा मिळू शकतो. यातील विम्याचा हप्ता म्हणजे प्रीमियम केंद्र आणि राज्य सरकार मिळून 50 ते 85 टक्क्यांपर्यंत अनुदान म्हणून भरते. म्हणजे शेतकऱ्याला फक्त 15 ते 50 टक्के हप्ता भरावा लागतो. उदाहरणार्थ जर प्रीमियम 2000 रुपये असेल तर शेतकऱ्याला फक्त 300 ते 1000 रुपये भरावे लागतील. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना जास्त अनुदान मिळते.

अर्ज कसा करावा? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

  • सध्या हे पोर्टल पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर सुरू झाले आहे.
  • सगळ्यात आधी pashudhan bima portal वर जा आणि शेतकरी म्हणून नोंदणी करा. आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका.
  • त्यानंतर तुमच्या जनावराची माहिती भरा. जनावराचा प्रकार, वय, टॅग नंबर, लसीकरण झाले आहे का हे भरा.
  • त्यानंतर जवळच्या पशुवैद्यकीय डॉक्टरकडून जनावराचे आरोग्य प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. हे प्रमाणपत्र पोर्टलवरूनच डॉक्टर व्हेरिफाय करतील.
  • प्रमाणपत्र व्हेरिफाय झाल्यावर विमा कंपनी तुमच्या जनावराची किंमत ठरवेल आणि प्रीमियम सांगेल.
  • तुम्ही ऑनलाईन प्रीमियम भरला की तुमची पॉलिसी लगेच पोर्टलवर तयार होईल आणि डाउनलोड करता येईल.

दावा कसा करावा ?

जर दुर्दैवाने जनावर दगावले तर 24 तासांच्या आत पोर्टलवर दावा करायचा आहे. जनावराचा फोटो, मृत्यूचे कारण, डॉक्टरांचे प्रमाणपत्र अपलोड करा. विमा कंपनीचे अधिकारी तपासणी करून 15 ते 21 दिवसात पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करतील. ही योजना पशुपालकांसाठी खूप महत्वाची आहे, कारण ग्रामीण भागात एक जनावर दगावले तरी कुटुंबाचे वर्षभराचे उत्पन्न जाते. या पोर्टलमुळे आता पारदर्शकता येईल आणि दलाली बंद होईल.