लोकसंवाद 2026 अंतर्गत सायबर फसवणुकीबाबत जनजागृती, ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन - टॉप न्यूज मराठी

पुणे : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभर लोकसंवाद 2026 हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत लोहगाव येथील संत नगर युवा प्रतिष्ठान, संत नगर येथे सायबर गुन्हे आणि सायबर फसवणुकीपासून बचाव या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पोलीस अंमलदार बाजीराव वीर यांनी सायबर फसवणुकीचे विविध प्रकार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. सोशल मीडियाचा गैरवापर, बनावट खात्यांद्वारे होणारी फसवणूक, अश्लील संदेश पाठवणे, मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करणे तसेच आर्थिक फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे असे त्यांनी सांगितले.

फिशिंग लिंक, ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड, लोन ॲप फ्रॉड, टास्क फ्रॉड, अनोळखी एपीके फाईल पाठवून होणारी फसवणूक, व्हॉइस क्लोनिंग, डिजिटल अरेस्ट, ट्रेडिंग फ्रॉड आणि क्रेडिट कार्ड फ्रॉड अशा विविध माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे श्री. वीर यांनी सांगितले.

नागरिकांनी आपल्या मोबाईल आणि सोशल मीडिया अकाउंटवर टू स्टेप ऑथेंटिकेशन सुरू ठेवावे, मजबूत पासवर्ड वापरावा, अनोळखी वायफाय नेटवर्क वापरू नये, कोणत्याही अनोळखी लिंकवर किंवा स्रोतावरून ॲप आणि फाईल डाउनलोड करू नये. अनोळखी व्यक्तींना ऑनलाइन प्रतिसाद देताना विशेष काळजी घ्यावी आणि कोणताही ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी त्याची पूर्ण खातरजमा करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी असेही सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक दिनेश राऊत, प्रवीण गुरव, समाधान फडतरे, संत नगर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश पवार, सचिव विकास माकने यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.