गेल्या काही दिवसांपासून पॅन कार्ड 2.0 ची चर्चा जोरात सुरू आहे. सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत की जुनं पॅन कार्ड बंद होणार आहे आणि सर्वांना नवीन पॅन कार्ड काढावे लागणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण नेमकं सत्य काय आहे ? तुमचं जुनं पॅन कार्ड खरंच बंद होणार आहे का ? आणि नवीन QR कोड असलेलं पॅन कार्ड म्हणजे काय ? याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकारने पॅन कार्ड सिस्टम अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्यासाठी पॅन 2.0 प्रोजेक्ट सुरू केला आहे. हा काही नवीन पॅन नंबर नाही तर पॅन कार्डची अपग्रेडेड आवृत्ती आहे. याअंतर्गत आता नवीन पॅन कार्डवर एक अत्याधुनिक QR कोड असणार आहे. या QR कोडमध्ये तुमची सर्व माहिती सुरक्षितपणे साठवलेली असेल. यामुळे बनावट पॅन कार्ड बनवणे जवळजवळ अशक्य होणार आहे.
हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे उत्तर आहे नाही. तुमचे जुने पॅन कार्ड पूर्णपणे वैध राहणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की कोणालाही आपले जुने पॅन कार्ड बदलण्याची सक्ती नाही. तुमचा पॅन नंबर तोच राहणार आहे. फक्त तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नवीन QR कोड असलेले पॅन कार्ड मागवू शकता. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, तुमचे सध्याचे पॅन कार्ड पुढेही चालणार आहे.
1. डायनॅमिक QR कोड : जुन्या पॅन कार्डवर देखील QR कोड होता पण तो साधा होता. नवीन पॅन कार्डवर डायनॅमिक QR कोड असेल, जो वेळोवेळी अपडेट होईल आणि अधिक सुरक्षित असेल. हा कोड स्कॅन केल्यावर तुमची खरी माहिती लगेच समजेल.
2. एकच पोर्टल : आत्तापर्यंत पॅन कार्डसाठी NSDL आणि UTIITSL या दोन वेगवेगळ्या वेबसाईट होत्या. आता पॅन 2.0 साठी एकच एकत्रित पोर्टल असणार आहे. त्यामुळे सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळतील.
3.मोफत ई-पॅन सुविधा : तुम्ही तुमचे ई-पॅन कार्ड म्हणजेच डिजिटल पॅन कार्ड मोफत डाऊनलोड करू शकता. त्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
4.पर्यावरणपूरक प्रक्रिया : संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस असणार आहे, त्यामुळे कागदाचा वापर कमी होईल.
जर तुम्हाला तुमचे जुने पॅन कार्ड बदलून नवीन पॅन 2.0 कार्ड हवे असेल तर त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.
स्टेप 1 : सर्वात आधी NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर जा - http://tin-nsdl.com
स्टेप 2 : तिथे Reprint of PAN Card या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमचा पॅन नंबर, आधार नंबर आणि जन्मतारीख टाका.
स्टेप 4 : तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाका.
स्टेप 5 : त्यानंतर 50 रुपयांचे शुल्क भरा. जर तुम्हाला फिजिकल कार्ड घरपोच हवे असेल तर हे शुल्क लागेल. फक्त ई-पॅन हवा असेल तर ते मोफत मिळेल.
स्टेप 6 : पेमेंट केल्यानंतर 15 ते 20 दिवसांत तुमचे नवीन पॅन कार्ड तुमच्या घरी पोस्टाने येईल. तर ई-पॅन तुम्हाला लगेच तुमच्या ईमेलवर मिळेल.
जर तुमच्या जुन्या पॅन कार्डवरील फोटो अस्पष्ट असेल, सही व्यवस्थित नसेल किंवा QR कोड स्कॅन होत नसेल तरच तुम्ही नवीन कार्डसाठी अर्ज करावा. तसेच जर तुमच्या पॅन कार्डची माहिती आधारशी जुळत नसेल तर देखील तुम्ही नवीन कार्ड मागवू शकता. इतर कोणालाही नवीन कार्ड काढण्याची गरज नाही.
त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करून पॅन अपडेट करू नका. फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच व्यवहार करा.