मोठी बातमी : मिरज सिव्हील हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला, 2 ठार, 7 जखमी, बचावकार्य सुरू - टॉप न्यूज मराठी

मोठी बातमी : सांगली जिल्ह्यातील मिरज येथून मोठी दुर्घटना समोर आली आहे. मिरज शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नवीन कमान उभारण्याचे काम सुरू होते. स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक संपूर्ण स्लॅब खाली कोसळला. या अपघातात सुरुवातीला 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती होती.

या दुर्घटनेत 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना त्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णालय प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 6 ते 7 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या बांधकामाचा दर्जा निकृष्ट होता का, याची चौकशी करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.