वाचन उपक्रम : मुला-मुलींनी अनुभवले ‘गोष्टींचे सुंदर जग’! खडकी शिक्षण संस्थेच्या 2 शाळांना 1900 पुस्तके आणि 2 मोबाइल लायब्ररी - टॉप न्यूज मराठी

पुणे : विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच वाचन संस्कार रूजविण्यासाठी खडकी शिक्षण संस्थेच्या जी. एम. आय. कन्याशाळा आणि आलेगावकर हायस्कूलमध्ये एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. ‘गोष्टींचे सुंदर जग’ या उपक्रमात मिळालेली नवनवीन गोष्टींची पुस्तके हाताळताना विद्यार्थी-विद्यार्थिनी हरखून गेले होते.

‘युनायटेड वे मुंबई’ आणि ‘नेल्सन’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. खडकी शिक्षण संस्थेच्या शिक्षक प्रतिनिधी वैशाली वाघ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा उपक्रम दोन्ही शाळांमध्ये यशस्वी झाला. 

या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला गोष्टींची पाच पुस्तके, एक रीडिंग जर्नल, एक पेन आणि एक आकर्षक बॅग मोफत देण्यात आली. ज्ञानाच्या या नव्या पाऊलवाटेत दोन्ही शाळांना एकूण 1900 पुस्तके आणि 2 मोबाइल लायब्ररी देखील प्रदान करण्यात आल्या. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरही वेगवेगळी पुस्तके वाचता येणार आहेत.

कार्यक्रमाला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमकुमार इंदोरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांना मिळालेल्या पुस्तकांची माहिती घेतली. या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिव आनंद छाजेड यांच्यासह प्रशासक मंडळ, विविध शाळांचे प्राचार्य, पर्यवेक्षक आणि शिक्षकांनी आवर्जून उपस्थिती लावली. 

जी. एम. आय. कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा चपटे आणि आलेगावकर हायस्कूलचे प्राचार्य उद्धव घाडगे यांनी या उपक्रमासाठी मोलाचे पाठबळ दिले.